शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील भाजपाच्या वाटेवर ? दोन दिवसापूर्वी केले होते एकनाथ शिंदे यांचे समर्थन 

करमाळा –  शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील (Narayan Patil) यांनी आज आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली असून ते भाजपात (BJP) प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा करमाळा माढा मतदारसंघात सुरु आहे. तसेच आगामी जिल्हापरिषद पंचायत व नगरपालिका निवडणूका ते भाजपाच्या ‘कमळ’या अधिकृत चिन्हावर लढवणार असल्याचे खात्रीलायक सुत्रांकडून समजले आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पाटील हे शिवसेनेचे  विद्यमान आमदार असताना संपर्क प्रमुख तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या हेकेखोर पणा मुळे नारायण पाटील यांची उमेदवारी कट झाली होती. सावंत यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे  सोलापूर (Solapur) जिल्ह्यात शिवसेनेचेच अतोनात नुकसान झाल्याची चर्चा त्यावेळेस झाली होती त्यामुळेच पक्षांने त्यांना मंत्रीपदापासुन दुर ठेवले होते. नारायण पाटील यांची पक्षाने उमेदवारी कापून देखील ते शिवसेनेच्या उमेदवार रश्मी बागल (Rashmi Bagal) यांच्या पेक्षा 25 हजारांचे मताधिक्य घेऊन ते दुसर्‍या क्रमांकावर राहिले होते. या निवडणुकीत ते निसटत्या मतांनी पराभूत झाले होते.

विधानसभा निवडणुकी नंतर देखील ते मातोश्री (Matoshree) च्या संपर्कात होते मात्र एकनाथ शिंदे 9Eknath Shinde)  यांचे समर्थक म्हणून ते ओळखले जात होते.तर जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते-पाटील यांचे समर्थक म्हणून देखील ते काम करत होते कारण पाटील यांना आमदार करण्यात करमाळा तालुक्यातील मोहिते-पाटील गटाचे योगदान देखील महत्वाचे होते. मोहिते-पाटील की शिवसेना (Shivsena) अशी देखील त्यांची गोची होत होती.  नुकत्याच झालेल्या राजकीय उलथापालथीत त्यांनी एकनाथ शिंदे यांचे समर्थन केल्याने ते एकनाथ शिंदे गटात सामील होतील अशी चर्चा सुरु होती. मात्र आपला हक्काचा माणूस शिंदे गटाच्या गळाला लागण्या आगोदर मोहिते-पाटील यांनी नारायण पाटील यांची  देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांच्यात बैठक घडवून आगामी निवडणुकीत  सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन घेतल्याचे खात्रीलायक वृत्त असून राज्यातील सत्तानाट्य संपल्यानंतर भव्य शेतकरी मेळावा घेऊन फडणवीस यांच्या उपस्थितीत नारायण पाटील हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

दुसरीकडे शिंदे गटात गेलो तर पुन्हा तानाजी सावंत यांचा अडसर नको अशी देखील भावना पाटील समर्थकांची असल्याने पाटील यांनी शिंदे ऐवजी फडणवीस यांचे नेतृत्व स्वीकारून मोहिते-पाटील यांचा वरदहस्त देखील कायम ठेवण्यात यश मिळवल्याची चर्चा आहे.दरम्यान  पाटील यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवु शकला नाही.