गौतमी पाटीलविरोधात बार्शीत गुन्हा दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण

बार्शी – आपल्या डान्सने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्याविरुद्ध बार्शीत गुन्हा दाखल झालाय. कार्यक्रमाला उशीरा येऊनही अवांतर पैसे घेतल्याचा आरोप करत आयोजकांनी गौतमीविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याचे समजत आहे. या प्रकरणावर गौतमी पाटील हिची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. गौतमीने ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना याबद्दल माहिती दिली आहे.

“मला या गोष्टीची अजूनही माहिती नाही. मी अजून याबाबत कोणतीही माहिती घेतलेली नाही. मी याबाबतचा व्हिडीओ दुपारी पाहिला. मी याबाबत पूर्ण माहिती काढून सविस्तर माहिती देईन. आता सध्या तरी मी याबाबत काहीच बोलू शकत नाही”, अशी प्रतिक्रिया गौतमीने बार्शीत घडलेल्या घटनेवर दिलीय.

“मी वेळेत पोहोचले होते. आजपर्यंत असं घडलं नाहीय की, लेट गेले आणि उशिराने कार्यक्रम सुरु झालाय. मी वेळेत पोहोचले होते. मला दहा वाजेपर्यंत परवानगी असते. माझ्या कार्यक्रमाला पोलीस असतात. त्यांची साथ असते. त्यामुळे त्यांचं म्हणणं मला ऐकावं लागणार. ते मला म्हटले दहाला कार्यक्रम बंद करा. तर मी दहा वाजता कार्यक्रम बंद करणारच आहे. याबाबत मी सविस्तर माहिती घेऊन आपल्याशी बोलेन”, अशी प्रतिक्रिया गौतमीने दिली.