छत्रपती शिवाजी महाराज जयंतीसाठी शासनाची नियमावली जाहीर

नांदेड :- छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शनिवार 19 फेब्रुवारी 2022 रोजी महाराष्ट्रात मोठ्या उत्सवात साजरी करण्यात येते. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव लक्षात घेता हा उत्सव साजरा करताना नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहे. यावर्षी 19 फेबुवारी 2022 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करत असतांना शिवज्योत वाहण्याकरीता 200 भाविकांना व शिवजयंती उत्सवाकरीता 500 भाविकांना परवानगी देण्यात आली आहे.

अनेक शिवप्रेमी, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी अथवा इतर गड किल्यांवर जाऊन तारखेनुसार दिनांक 18 फेबुवारी रोजीच्या मध्यरात्री 12 वाजता एकत्र येतात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करतात. यावर्षी कोविड-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठया प्रमाणात एकत्र न येता छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.

दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी या कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.

प्रभात फेरी, बाईक रॅली अथवा मिरवणुक काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला/प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्याठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करावी.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम शिबिरे, रक्तदान, आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेग्यु इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग तसेच स्वच्छतेचे नियम मास्क, सॅनिटायझर इक्यादी पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

कोविड-19 च्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनवर्सन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकिय, शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलिस, प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्धी झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, अशा सूचना शासनाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे निर्गमित केल्या आहेत.