‘४००हून अधिक आत्महत्या झाल्या तरी आघाडी सरकारला एसटी कर्मचाऱ्यांविषयी कोणतीच संवेदना नव्हती’

मुंबई| राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि तत्कालीन महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील घरावर हल्ला केल्याचा आरोप (Sharad Pawar Home Attack) असणाऱ्या ११८ राज्य परिवहन महामंडळाच्या बडतर्फ कर्मचाऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadanvis Government) शुक्रवारी पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. अशातच आता भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे.

शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयाची प्रशंसा करताना त्यांनी महाविकास आघाडीवर टीकाही केली आहे. महाआघाडीच्या कार्यकाळात शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतरही सरकारला त्यांच्याबद्दल कोणतीच संवेदना नव्हती, अशा शब्दांत त्यांनी कान टोचले आहेत.

आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर गोपीचंद पडळकरांनी लिहिले की, “४०० हून अधिक आत्महत्या झाल्यातरी महाआघाडी सरकारला एसटी कर्मचाऱ्यांविषयी कोणतीच संवेदना नव्हती. एसटी आंदोलनातील बडतर्फ ११८ कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे घेत प्रस्थापित नाही तर विस्थापितांच्या बाजूचे आम्ही आहोत असा संदेश आमच्या युती सरकारने दिला आहे.”

गुणरत्न सदावर्तेंकडून शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाची स्तुती
११८ राज्य परिवहन महामंडळाच्या बडतर्फ कर्मचाऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर एसटी कामगारांचे नेते आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबईत मोठी घोषणा केली आहे. आगामी निवडणुकीत ‘कष्टकरी जनसंघ’ या त्यांच्या एसटी कामगारांच्या संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देण्याचं जाहीर केलं. तसेच पुढील निवडणुकीत मुंबईतील २४ हजार कष्टकरी शिंदे-फडणवीसांसाठी काम करतील, असं सांगितलं.

गुणरत्न सदावर्ते म्हणाले, आम्ही मुख्यमंत्री शिंदेंना दोन गोष्टी अवगत केल्या. त्यांना सांगितलं की, कष्टकरी जनसंघ सर्वात बलशाली संघ आहे. तसेच आगामी निवडणुकीत मुंबईतील २४ हजार कष्टकरी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांसाठी काम करतील.

या निर्णयाने आम्ही भारावून गेलो आहोत. आता त्याच आझाद मैदानावर ५० हजार कष्टकऱ्यांचा मेळावा घेण्यात येईल. त्या मेळाव्याला शिंदे आणि फडणवीसांनी उपस्थित रहावं. दोघांनीही आम्हाला त्यासाठी होकार दिला आहे, असंही गुणरत्न सदावर्तेंनी सांगितलं.