सरकारला फक्त टक्केवारी गोळा करण्यात रस, बहुजन पोरांविषयी त्यांना काहीही देणंघेणं नाही – पडळकर 

मुंबई : म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली आहे. काही अपरिहार्य आणि तांत्रिक अडचणींमुळे म्हाडाच्या व इतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा जानेवारीमध्ये होणार आहेत. आज परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांची जी गैरसोय होणार आहे, त्याबद्दल मी क्षमा मागतो. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी. कोणत्याही विद्यार्थ्याने परीक्षा देण्यासाठी सेंटरवर जाऊ नये, गाव सोडू नये असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या सर्व प्रकारामुळे आता सरकारवर टीका होऊ लागली आहे. भाजपनेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी याच मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले आहे. ते म्हणाले,प्रस्थापितांचे बोलघेवडे जितेंद्र आव्हाड गृह निर्माण खात्याचा दर आठवडायाला एक्सेल शीट मध्ये न चुकता हिशोब घेतात.पण बहुजन पोरांच्या भविष्याशी निगडीत असलेल्या म्हाडा नोकरी बाबत लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ नाही.

पडळकर म्हणाले, ते स्वतःच मागील आठवड्याभरापासून म्हाडाचे नोकर भरती परिक्षामध्ये घोटाळे होणार आहेत,  त्यात बळी पडू नये म्हणून प्रसारमाध्यातून आवाहन करत होते. जर त्यांना घोटाळ्याची पूर्व कल्पना होती आणि गृहखातेही राष्ट्रवादीकडे असतानासुद्धा त्यांना मध्यरात्री दिड वाजता परिक्षा रद्द का करावी लागली.यावरून सिद्ध होते की प्रस्थापितांच्या सरकारला फक्त आणि फक्त टक्केवारी गोळा करण्यात रस आहे.एक एक पै गोळा करून परिक्षेसाठी पोहचलेल्या बहुजन पोरांविषयी, नोकरी अभावी आत्महत्या करणाऱ्या बहुजन पोरांविषयी त्यांना काहीही देणंघेणं नाहीये असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.