‘परिक्षार्थ्यांची अशी क्रूर चेष्टा करून त्यांच्या भविष्याशी खेळ करायला या सरकारला शरम वाटली पाहिजे’

मुंबई : सरकारच्या भोंगळ कारभाराचा प्रत्यय राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आला आहे. कारण म्हाडाच्या परीक्षा अचानकपणे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली आहे. काही अपरिहार्य आणि तांत्रिक अडचणींमुळे म्हाडाच्या व इतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा जानेवारीमध्ये होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाडांची मध्यरात्री ट्वीट करत म्हाडाची आज रविवारी होणारी परीक्षा व त्यानंतर होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे अशी घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांची क्षमा मागत त्यांनी ही माहिती दिली असून याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर या प्रकरणी आता भाजपच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून या संदर्भात एक पोस्ट करण्यात आली असून राज्य सरकारवर टीका करण्यात आली आहे. गरिब, वंचितांच्या आयुष्याशी खेळण्याचा ठाकरे-पवार पॅटर्न? आधी आरोग्य भरतीच्या परिक्षेत गोंधळ. आता म्हाडाच्या परिक्षेचे तीन तेरा वाजल्येत. परिक्षार्थ्यांची अशी क्रूर चेष्टा करून त्यांच्या भविष्याशी खेळ करायला या सरकारला शरम वाटली पाहिजे!!! असं या ट्वीट मध्ये म्हटले गेले आहे.