सरकारला लोकमान्यता नसून, महाराष्ट्राचं हित जपण्यात सरकारला अपयश – अंबादास दानवे

Maharashtra Assembly Monsoon Session : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरु होत आहे. येत्या चार ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. राज्यातली बदलेली राजकीय समीकरणं; पहिल्यांदाच दोन उप-मुख्यमंत्र्यांचा समावेश असलेलं विद्यमान सरकार आणि सत्ताधारी तसंच विरोधी पक्ष अशा दोन्हीकडे असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांचे विभागलेले दोन गट, शिवसेना शिंदे गटातल्या 16 आमदारांचा मुद्दा, यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.

शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आजपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Monsoon Session) पार पडत आहे. त्यामुळे दुखावलेले विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक होणार की अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) गट सत्तेत आल्याने सत्ताधारी वरचढ ठरणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने अडचणीत आलेला शेतकरी, महागाई यासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर विरोधक सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

दरम्यान, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षानं बहिष्कार टाकला. सरकारला लोकमान्यता नसून, महाराष्ट्राचं हित जपण्यात सरकारला अपयश आल्याचं विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विरोधकांतर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.