त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्रस्तावित विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार – नीलम गोऱ्हे

मंदिर परिसराचा घेतला आढावा

त्र्यंबकेश्वर/नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिर हे पुरातन असल्याने त्या ठिकाणी सुविधा निर्माण करण्यासाठी पुरातत्व विभागाकडून मर्यादा येत आहेत. यामुळे भाविकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. भाविकांना योग्य अशा सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता पुरातत्व खात्याच्या येणाऱ्या मर्यादा लक्षात घेता त्यांच्यासोबत बैठक घेऊन त्या बैठकीत तोडगा काढणार असल्याचे मत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी व्यक्त केले.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वराची पूजा केली. यावेळी, देवस्थानचे विश्वस्त  सत्यप्रिय शुक्ल, श्री. प्रशांत गायधनी, मंदिरातील पुजारी मयूर थेटे यांच्यासोबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विकासकामांचा आढावा घेऊन चर्चा केली. यावेळी स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलमताई जोशी, भैय्या बाहेती, संदीप वाळके,  लकी ढोकणे,  गिरीश आव्हाड आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, मंदिरात देशभरातून भाविक येतात त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. पावसाळ्याच्या दिवसात भाविक पाय घसरून पडू शकतात त्यासाठी देवस्थानने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मंदिरात होणाऱ्या श्रावणातील विशेष पूजेची माहिती घेतली.

मंदिरात देशभरातून भाविक येत असतात. त्यामुळे वेगवेगळ्या भाषेत सूचना फलक लावणार असणार असल्याचे देवस्थानच्या विश्वस्तांनी डॉ. गोऱ्हे यांना सांगितले. यासोबतच मंदिराची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी याकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याचे सांगितले.