‘मला लोक प्रेमाने भाऊ म्हणतात, पण मला भाऊ व्हायचे नाही, तर..’ 

पुणे  : देशात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार असल्याने केंद्राकडून भरपूर निधी मिळत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाला निधीची कमतरता नाही. आजवर राज्य सरकारने ९७ टक्के कामाच्या निविदा काढल्या आहेत. राज्यात मोठ्या स्वरूपात भूजल संरक्षणाचे काम सुरू असून, नैसर्गिक २७०० स्त्रोत शोधून कामासाठी मंजूर केले आहेत. जलजीवन मिशनवर काम करणारा कार्यकर्ता असून, येणाऱ्या काळात प्रत्येकाला स्वच्छ व मुबलक पाणी देण्याचे उद्दिष्ट्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (  Minister Gulabrao Patil) यांनी केले.

पाणी व्यवस्थापनाशी संबंधित तंत्रज्ञान, विकास, नियोजन यासाठी कार्यरत इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनच्या (आयवा) तीन दिवसीय ५५ व्या अखिल भारतीय वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. हडपसर येथील मेस्से ग्लोबल सेंटर (लक्ष्मी लॉन्स) येथे होत असलेल्या अधिवेशनात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जैसवाल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव अभिषेक कृष्णा, ‘आयवा’चे मावळते अध्यक्ष इंजि. प्रमोद कुमार सिन्हा, नवनिर्वाचित अध्यक्ष इंजि. सुभाष भुजबळ, राष्ट्रीय उपाध्यक्ष एम. मथियालगन, राष्ट्रीय महासचिव इंजि डॉ. दयानंद पानसे, संयोजन समिती सचिव व अधीक्षक अभियंता इंजि. वैशाली आवटे, व्हा. चेअरमन इंजि. पी. डी. भामरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणेचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे, आयवा पुणेचे सचिव के. एन. पाटे आदी उपस्थित होते.

पाणीपुरवठा क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल लखनौ येथील इंजि. अनिल कुमार गुप्ता यांना ‘जलनिर्मलता’, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथील डॉ. पराग सदगीर यांना ‘जलसेवा’, तर लखनौ येथील पल्लवी राय यांना युवा महिला अभियंता म्हणून ‘ब्रिजनंदन शर्मा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इतर पुरस्कारांचे वितरण यावेळी झाले. ‘आयवा’च्या संकेस्थळाचे अनावरण, तसेच स्मरणिकेचे प्रकाशन झाले.

गुलाबराव पाटील म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाण्यासाठी गड, किल्यावर खास सोय केली आहे. त्यामुळे आत्ताच्या ज्या काही योजना आहेत, त्या नवीन नाहीत. महाराष्ट्रात शिवरायांनी पाण्यासाठी तलाव बांधलेले असून, ते आजही पाहायला मिळतात. याशिवाय कोयना, गोदावरी, भद्रा, या नद्यावरील पाणी पूर्वी आपण पित होतो. आता मात्र ते आठ टक्के राहिले आहे. शेतीसाठी ९२ टक्के पाणी वापरले जाते. त्यावर काम केले जात आहे. म्हणून पाण्यावर विचारमंथन होण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली आहे.

पाणी हा विषय केवळ भाषण किंवा समारंभापुरता मर्यादित नाही. पाण्यावर विचारमंथन झाले, तर त्याचे अमृत होईल, जे मानवासाठी वरदान ठरेल. प्रत्येक व्यक्तीला ५५ लीटर पाणी मिळाले पाहिजे, यासाठी आम्ही काम करत आहोत. देशाची पाणी समस्या सोडविण्यासाठी जलजीवन मिशन, घरघर शौचालय होण्याची गरज आहे. त्यासाठी सरकार काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हर घर नल, हर घर जल ही योजना प्रामुख्याने देशभर राबविली जात असून, सध्या सगळीकडे जलजीवनचाच बोलबाला आहे,  असे गुलाबराव पाटील यांनी नमूद केले.

संजीव जैसवाल म्हणाले,  बांधकाम व जलसंपदा यापेक्षा पाणीपुरवठा विभागाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. पाण्याचा पुर्नवापर करताना सरकारने भर दिला पाहिजे. आपल्याकडे समुद्र असला तरी त्याचे पाणी वापरासाठी येत नाही. केंद्र शासनाने जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकांना ५५ लीटर पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. आजही शहरी, ग्रामीण भागात पाणी देण्याच्या विषयावर चर्चा करत आहोत. पण ते अद्यापही मिळत नाही. सरकारने योजना केल्यानंतर अंमलजबजावणीनंतर त्या यशस्वीपणे चालत नाही. कारण, देखभाल, कर, वाढीव वीज दर अशा
विविध कारणामुळे त्या योजना बंद होतात. यासाठी संबधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाते. योजना करताना ती यशस्वी पद्धतीने चालण्यासाठी तीचा योग्य तो आराखडा बनण्याची गरज आहे.

अभिषेक कृष्णा म्हणाले,  शात बदल घडवीत असताना स्वच्छ पाणी मिळणे गरजेचे आहे. येत्या काळात भारतातील नागरिकांना स्वच्छ पाण्यासाठी आरओ बसविण्याची गरज लागणार नाही. कारण नळाद्वारे स्वच्छ पाणी मिळण्यासाठी तशी व्यवस्था तयार करण्यासाठी सरकार आटोकाट प्रयत्न करत आहे.

सुभाष भुजबळ म्हणाले,  जलजीवन मिशन, अमृत योजना यासह इतर पाणीपुरवठा व स्वच्छतेसंदर्भात काम करणाऱ्या अभियंत्यांना हे अधिवेशन मार्गदर्शक ठरेल. विचारांचे, तंत्रज्ञानाचे आदानप्रदान होणारे हे व्यासपीठ असून, योजना अधिक प्रभावीपणे कशा राबविता येतील, यावर पुढील तीन दिवस विचारमंथन होईल. इंजि. प्रमोद कुमार सिन्हा यांनीही मनोगत व्यक्त केले. मानसी सोनटक्के यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दयानंद पानसे यांनी प्रास्ताविक केले. इंजि. राजेंद्र रहाणे यांनी आभार मानले.

भाऊ नको; पाणीवाला बाबा व्हायचेय
गुलाबराव पाटील यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करत ‘मला लोक प्रेमाने भाऊ म्हणतात. पण मला भाऊ व्हायचे नाही, तर मला पाणीवाला बाबा व्हायचे आहे. कारण पाणी पाजणे हे पुण्याचे काम असून, ते आपल्याला करायचे आहे. ‘वर दाढीवाला, इथे मंत्री दाढीवाला आणि सचिवही दाढीवाला’ असे म्हणत केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात मंत्री गुलाबराव पाटील आणि विभागात प्रधान सचिव संजीव जैसवाल अशी जोडी जमल्याची टिपण्णी केली. जैसवाल व कृष्णा यांच्याकडे पाहत हा प्रज्ञावंताचा मेळा आहे. मी काही इतका शिकलेलो किंवा हुशार नाही, पण तुमच्यासमवेत बसून तज्ज्ञता येते. त्यामुळे जनतेला पाणी देण्यासाठी आपण एकत्रित काम करू असे, पाटील यांनी मिश्कीलपणे नमूद केले.