२०१९ मध्ये अजितदादा पवार यांना उपमुख्यमंत्री केले नसते तर ते सरकार टिकले नसते – तटकरे

Sunil Tatkare – राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने परभणी आणि धाराशिव या दोन जिल्हयात दोन मोठे मेळावे घेण्यात येणार असून या मेळाव्याला राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), मी आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) व इतर नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

१४ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हयात एकाच वेळी महायुतीचे मेळावे होणार असून यावेळी तालुका, जिल्हा पदाधिकारी, त्यामध्ये महिला, युवक व सेलचे पदाधिकारी म्हणजे किमान १२०० ते १५०० प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. राज्यात आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात प्रमुख नेते मार्गदर्शन या मेळाव्यात करतील. याची रुपरेषा ठरवण्यासाठी ५ जानेवारीला समन्वय समिती आणि घटक मित्र पक्षाची बैठक मंत्री दादाजी भुसे यांच्या बंगल्यावर घेणार आहोत अशीही माहिती सुनिल तटकरे यांनी दिली.

१८ जानेवारीला राष्ट्रवादी महिला प्रदेशचा मेळावा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सर्व मंत्री उपस्थित राहणार आहेत असेही सुनील तटकरे यांनी सांगितले.

विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या कालावधीत आमदारांची दर मंगळवारी जी बैठक होते ती काल देवगिरी बंगल्यावर पार पडली. या बैठकीत जानेवारी महिन्यात आणि फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात आमच्या आमदारांच्या विधानसभा मतदारसंघात अजितदादा पवार आणि मी व इतर नेते यांचे संयुक्त दौरे आयोजित करण्याचे नियोजन केले आहे. हे करत असतानाच महायुतीचे सहा मेळावे मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर याठिकाणी फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात निश्चित करण्यात आले आहेत ही माहितीसुध्दा सुनिल तटकरे यांनी दिली.

मार्च महिन्यात लोकसभा निवडणुक जाहीर होईल. या निवडणुका सात टप्प्यात होतील. त्याअगोदर तिन्ही पक्षाचे कार्यक्रम घेतले जातील. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितल्याप्रमाणे १४ जानेवारीनंतर जागा वाटपाबाबत तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसतील आणि घटक पक्षांना घेऊन ही चर्चा पूर्ण होईल असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

आज (बुधवार) पक्षाच्या सेलच्या नियुक्तीबाबत देवगिरी बंगल्यावर बैठक झाली. त्यावेळी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा उत्साह पहायला मिळाला. आम्ही कर्जतला वैचारिक मंथन शिबीर घेतले त्यामध्ये पक्षाची स्पष्ट भूमिका आम्ही मांडली. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतसुध्दा आगामी कालखंडातील अजेंडा सेट केला. त्यानंतर महाराष्ट्रात अजून मोठ्याप्रमाणावर पाठबळ वाढलेले पहायला मिळत आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात पक्षाचा नियोजित कार्यक्रम समोर ठेवला आहे असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

जितेंद्र आव्हाड हे बेदखल झालेले नेते आहेत. २०१९ मध्ये अजितदादा पवार यांना उपमुख्यमंत्री केले नसते तर ते सरकार टिकले नसते असा दावा सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना केला. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा निकालावर सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचा निर्णय झाला नसता आणि तो सिक्रेट प्लॅनने झाला असता तर कदाचित पहिल्या दिवशीच सरकार पडू शकलं असतं. त्यामुळे आव्हाडांचा दावा हा निखालस खोटा आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

अजित पवार यांनी संघटनेत काम केले त्याचा प्रत्यंतर अनेकवेळा पहायला मिळाला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री केले ते चूक की बरोबर हे काळाच्या ओघात सिध्द झाले आहे. याहीपेक्षा अजितदादा पवार विरोधी पक्षनेते झाले ते बहुसंख्य आमदारांनी मागणी केली होती. त्याहीपुढे अजितदादा पवार यांचे ऐकले नाही म्हणूनच ५३ पैकी ४३ आमदार आज दादांच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे त्यांचे सामर्थ्य संघटनेत, विधीमंडळात काय आहे हे झारखंडचे एक आमदार, नागालँडचे सात आमदार पाठीमागे उभे आहेत त्यामुळे त्यांची ताकद आता स्पष्ट झाली आहे असेही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट केले.

निराशेच्या गर्तेत सापडलेली माणसं आणि आयुष्यभर खोटं बोलून स्वतःचे राजकीय महत्त्व वाढवलेली माणसं यापेक्षा काय बोलणार आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार असा टोलाही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना लगावला.

राहुल गांधी यांच्या पदयात्रेनंतर आपणही पदयात्रा महाराष्ट्रात काढावी आणि महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नेते आहोत असे दाखवावे या कारणासाठी काढलेल्या संघर्ष यात्रेला राहुल गांधी यांच्या पदयात्रेपेक्षा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असल्यामुळे कदाचित ते विश्रांतीला गेले असावेत म्हणून त्यांनी शिबीराला जाणे टाळले असेल असा खोचक टोला सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना लगावला.

त्यांना जाणवलं असेल संघर्ष यात्रेत अभूतपूर्व प्रतिसाद बघता शिबीरापेक्षा एक ऐतिहासिक कामगिरी त्यांच्या हातून घडल्याने पक्ष संघटनेकडे आज वेळ द्यायला गरज भासली नसेल असेही सुनिल तटकरे म्हणाले.

या पत्रकार परिषदेला प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, आनंद परांजपे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, संग्राम कोते पाटील आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

‘त्यांच्या विचारांमध्ये रामापेक्षा रावण प्रकर्षानं..’, रामाला मांसाहारी म्हणणाऱ्या आव्हाडांवर भाजपाची टीका

‘राम बहुजनांचे, ते मांसाहारी अन्न खात असत’, जितेंद्र आव्हाड यांचे विधान

अभिषेक बच्चनसोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या राय पोहोचली बागेश्वर बाबांच्या दरबारात