‘महायुती’ तर्फे 14 जानेवारी रोजी राज्यभर मेळावे, लोकसभेच्या 45 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार

Chandrashekhar Bawankule:- लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीतील 11 घटक पक्षांचे 14 जानेवारी रोजी राज्यभर जिल्हावार मेळावे होणार असल्याची घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी केली. ‘महायुती’तर्फे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) बोलत होते.

शिवसेना नेते आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे, मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष समीर भुजबळ, भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये हे यावेळी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत ‘महायुती’ला (Mahayuti) 51 टक्के मतांसह 45 पेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्‍वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

बावनकुळे म्हणाले की, मकरसंक्रांतीच्या पर्वावर 14 जानेवारी रोजी राज्यातील 36 जिल्ह्यांत ‘महायुती’तील 11 पक्षांचे संयुक्त मेळावे होणार आहेत. जिल्हा मेळाव्यांना घटकपक्षांचे जिल्हा पातळीवरील प्रमुख नेते, पालकमंत्री तसेच घटकपक्षांनी नेमलेले संपर्क मंत्री उपस्थित राहणार आहेत. जिल्हास्तरीय मेळाव्यानंतर तालुका आणि बूथस्तरीय मेळावे घेण्याचा निर्णय ‘महायुती’ने घेतला आहे. फेब्रुवारीमध्ये विभागीय स्तरावर मेळावे होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह राज्य मंत्रीमंडळातील सर्व मंत्री , घटक पक्षांतील नेते या मेळाव्यांना उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यांना रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महादेव जानकर,शिवसंग्राम च्या ज्योतीताई मेटे, विनय कोरे, जयदीप कवाडे, सुलेखा कुंभारे आदी उपस्थित राहणार आहेत.

• 51 टक्के मते मिळवण्याचा ‘महायुती’चा निर्धार
राज्यभरातील प्रवासात आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची लाट अनुभवण्यास मिळाली असून राज्यात ‘महायुती’चे 45 पेक्षा अधिक उमेदवार विजयी होतील, असे सांगून बावनकुळे म्हणाले की, बूथस्तरापर्यंत रचना तयार करून 51 टक्के मते मिळवण्याचा ‘महायुती’चा निर्धार आहे. मोदी लाट दिसू लागल्यामुळे यापुढील काळात ‘महायुती’मध्ये आणखी मोठे पक्ष प्रवेश होतील.

• ‘महायुती’चे सर्व नेते व कार्यकर्त्यांची एकजुट
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत भाजपा-राष्ट्रवादी-शिवसेना यांच्यासह ‘महायुती’तील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांतील समन्वय वाढावा, यासाठी हे मेळावे होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत साकारण्यासाठी ‘महायुती’चे सर्व नेते आणि कार्यकर्ते एकजुटीने कामाला लागले आहेत.

शिवसेना नेते आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे यांनी सांगितले की, केंद्रातील मोदी सरकारप्रमाणेच राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अनेक विकासकामे केली आहेत. ही विकासकामे तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी ‘महायुती’च्या घटक पक्षांचे मेळावे होणार आहेत.गावपातळीपर्यंतच्या कार्यकर्त्यांमध्ये अधिक समन्वय निर्माण होण्यासाठी या मेळाव्यांचे आयोजन करण्यात आल्याचे भुसे यांनी नमूद केले.

महत्वाच्या बातम्या-

‘त्यांच्या विचारांमध्ये रामापेक्षा रावण प्रकर्षानं..’, रामाला मांसाहारी म्हणणाऱ्या आव्हाडांवर भाजपाची टीका

‘राम बहुजनांचे, ते मांसाहारी अन्न खात असत’, जितेंद्र आव्हाड यांचे विधान

अभिषेक बच्चनसोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या राय पोहोचली बागेश्वर बाबांच्या दरबारात