एसटी कर्मचाऱ्यांना तारीख पे तारीख, आता ‘या’ दिवशी होणार सुनावणी

मुंबई : इतिहासातील सर्वाधिक काळ सुरु असलेल्या एस.टी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आज मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी २७ ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे १४ हजार गाड्या स्थानक आणि आगारात उभ्या आहेत. दोन हजार गाड्यांच्या माध्यमातून राज्यात केवळ दहा टक्के एसटी फेऱ्या सुरू आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या याचिकेला तारीख पे तारीख मिळताना दिसत आहे. कारण आजही या याचिकेवर सुनावणीला कोर्टाने पुढची तारीख दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या अहवालावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एसटीच्या विलीनीकरणाचा मुद्दा तापला होता.

मुंबई हायकोर्टात एसटी विलिकरणाच्या याचिकेवर आज सुनावणी झाली. या सुनावणीवेळी महामंडळाच्या वकिलांना मुख्य न्यायाधिशांनी विचारणा केली. 22 डिसेंबरला न्यायमूर्ती वाराळेंनी एक आदेश दिला होता. 22 डिसेबरला देण्यात आलेल्या आदेशानुसार एक मागणी सोडून बाकी सर्व मागण्या पूर्ण केल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं होतं. सेवा ज्येष्ठतेनुसार एसटी कर्मचाऱ्यांना पगार वाढही देण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. उच्च स्तरीय समितीचा सीलबंद अहवाल हायकोर्टापुढे सादर करण्यात आला. हा अहवाल पाहिलात का, अशी विचारणा महामंडळाच्या वकिलांना हायकोर्टात करण्यात आली. मुख्य न्यायाधिशांनी महामंडलाच्या वकिलांना ही विचारणा केली. तुम्ही आधी अहवाल पाहा, असं आमचं मत असल्याचं मुख्य न्यायाधिशांनी सांगितलं होतं. दरम्यान, आता शुक्रवारी या संदर्भातील पुढील सुनावणी पार पडणार आहे.