शिंदे गटातील आमदार बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी; हेमंत देसाई यांनी मारला पुन्हा एकदा टोमणा 

मुंबई – जवळपास 40 दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यात एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटाचे नऊ तर भाजपकडून (BJP) नऊ जणांचा शपथविधी पार पडला. या सर्व आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे.

दरम्यान,राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर शिंदे गटातील शपथ घेतलेले सर्व मंत्री दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी  जाऊन दर्शन घेतले आहे. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कामाला सुरुवात करण्यापूर्वी बाळासाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण येथे आल्याचं आमदारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

दरम्यान, यावरून पत्रकार हेमंत देसाई यांनी पुन्हा एकदा शिंदे गटातील आमदारांना टोमणा मारला आहे. ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीपाशी जाऊन दर्शन घेणाऱ्या ‘समृद्धी गटा’तील नेते व मंत्र्यांचे चेहरे पाहून आज उत्पल दत्त यांच्या शैलीत ‘कितना पवित्र वातावरण है!’ असेच म्हणावेसे वाटते… या नेत्यांचे बाळासाहेबांवरील प्रेम व श्रद्धा पाहून शिवाजी पार्कवर फिरायला येणारे अनेकजण म्हणे सद्गतीत झाले होते… समृद्धी गटाचा विजय असो! असं देसाई यांनी म्हटले आहे.