‘काश्मीरी पंडितांवर अन्याय ही तर भाजपचीच चूक’ हिंदू महासंघाने भाजपला झापलं

पुणे : काश्मिरी पंडितांच्या व्यथा मांडणाऱ्या द काश्मीर फाईल्स या सिनेमाची सध्या बरीच चर्चा होताना दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. या चित्रपटात अनुपम खेर यांच्यासोबत मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पुनीत इस्सार, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाईक कलाकार आहेत. या चित्रपटाचे अनेकजण कौतुक करत आहेत तर काही ठिकाणी विरोध देखील होताना दिसत आहे तसेच काही मंडळी यावर टीका देखील करताना दिसत आहेत.

‘द काश्मीर फाईल्स’सिनेमावरून हिंदू महासंघाने भाजपला फटकारलं आहे. “द काश्मीर फाईल्स सिनेमाबाबत भाजपने अवाक्षर काढू नये.भाजपवाल्यांनो, खोटं-खोटं रडू नका. हिंदुत्व हिताचं उसणं अवसान आणू नका.‘द काश्मीर फाईल्स’चं स्वागत करताय पण ही घटना घडली तेव्हा केंद्रात तुमचंच सरकार होतं, व्ही.पी सिंग तुमच्याच पाठिंबावर पंतप्रधान होते. अतिरेक्यांना तुम्हीच परत सोडलं, तेही पैसे देऊन! ज्या राज्यपालांच्या देखरेखीखाली हे हत्याकांड घडलं त्या जगमोहन यांना तुम्हीच राज्यपाल बनवलं, हे आम्ही विसरलेलो नाही. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाच्या 5 वर्षांच्या काळात आणि नरेंद्र मोदी यांच्या 7 वर्षांच्या काळात भाजपने काश्मीरी पंडितांसाठी काय केलं? काश्मीरी पंडितांवर अन्याय ही भाजपची चूक आहे, असं हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी म्हटलंय.

तर दुसरीकडे वकील असीम सरोदे यांनी केलेली एक फेसबुक पोस्ट देखील चर्चेचा विषय बनली आहे. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, काश्मीर फाईल्स ही असत्यालाप करणारी आणखी एक फिल्म आहे. असत्याला सत्याचे कपडे घालण्याचे प्रकार वाढले आहेत. असं म्हंटल आहे.