संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ साताऱ्यात हिंदुत्ववादी संघटना आणि धारकऱ्यांचा मोर्चा

Mumbai –  शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी उर्फ मनोहर भिडे (Sambhaji Bhide )यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आहे. भिडे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. पावसाळी अधिवेशनातही याचे पडसाद उमटत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी संभाजी भिडे यांच्याविरोधात आंदोलनं केली आहे. विशेष म्हणजे अजित पवारांच्या गटाने देखील भिडे यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे.

एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला साताऱ्यात त्यांच्या समर्थनार्थ  आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच पोवई नाक्यावर संभाजी भिडे यांच्या प्रतिमेला दुग्धभिषेक करण्यात आला. त्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. येथे शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांचे मार्गदर्शन झाले. यावेळी माध्यमांनी भिडे यांचा एकेरी उल्लेख टाळावा अशी आगपाखड देखील भिडे समर्थकांनी केली.मोर्चात मोठ्यासंख्येने धारकरी व महाविद्यालयीन युवक सहभागी झाले होते.