शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा सन्मान करता की अपमान; छगन भुजबळ यांचा सरकारला सवाल

मुंबई – येवला तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात आणि राज्यातील अनेक भागात विशेषतः विदर्भ व मराठवाड्यामध्ये जुलै मध्ये ऑगस्ट च्या पहिल्या सप्ताहामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे (Farmer) प्रचंड नुकसान झालेले आहे.या पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटलेला आहे. पावसामुळे कांदा,मका,सोयाबीन,द्राक्ष, डाळिंव, टॉमॅटो आदी पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे, हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत द्यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज विधानसभेत नियम २९३ मधील चर्चेवर बोलताना केली.

ते म्हणाले की काही ठिकाणी पिकांच्या पंचनाम्याचे कोणतेही आदेश नसल्याने मदत मिळणार की नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक घरे आणि रस्त्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे.सदर नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त आर्थिक मदत देण्याची मागणी आहे.उदाहरणादाखल येवला तालुक्यात कृषी विभागाच्या आकडेवारीप्रमाणे ९७ मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस होवून सुद्धा स्कायमेटच्या आकडेवारी प्रमाणे ६५ मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस दाखविल्यामुळे शेतकऱ्यांना मदतीबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यामुळे संततधार पावसामुळे झालेले नुकसान या निकषामधून तरी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे.

विधानसभेत बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. वाहून गेल्या आहेत. शेती नापिकी झाली आहे. मोठे ओढे व नाले यांचे पात्र वाढल्याने काठावरील सुपिक जमिन वाहून गेली आहे. या जमिनी पुढील काही वर्षे नापिक राहणार आहेत. यासाठी भरीव आर्थिक मदत देण्यात यावी.नगदी पिक म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. विदर्भ आणि मराठवाडयामध्ये सोयाबीन या पिकाबरोबरच कापूस या पिकाचे सुध्दा मोठे क्षेत्र आहे.

ते म्हणाले की, अतिवृष्टीमुळे विज वितरण व्यवस्था पूर्णत: कोलमडली आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले आहेत. डी.पी./ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाले आहेत. त्यांची दुरुस्ती करुन उपलब्धता करुन द्यावी अशी मागणी देखील मंत्री छगन भुजबळ यांनी केली.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी द्यावी ,हेक्टरी रु.७५ हजार मदत द्यावी, तसेच फळपिकांसाठी हेक्टरी रु.१ लाख ५० हजार तात्काळ मदत करावी.अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे.विद्यार्थ्यांचे या शैक्षणिक वर्षाकरिता सरसकट शैक्षणिक शुल्क माफ करावे.अश्या मागण्या देखील छगन भुजबळ यांनी केल्या.

शेतकरी सन्मान योजनेतील पात्र शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्याचा निर्णय दुर्दैवी

अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची उभी पिके नष्ट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे पैसा नाही त्यांना कर्जमाफी देण्याच्या देखील विचार करण्याची गरज आहे. येवला मतदरसंघातील सन्मान योजनेतील पात्र १३०० शेतकऱ्यांना पैसे परत करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहे. पैसे दिले नाही तर बोजा लावण्यात येईल असे आदेश काढण्यात आले आहे ही बाब अतिशय दुर्दैवी आहे. शासनाने पडताळणी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

मुंबई नाशिक महामार्गासह राज्यातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा

या अतिवृष्टीत नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण मार्ग, इतर जिल्हा मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग अशा २१७ रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने या रस्त्यांची दुरुस्ती तातडीने हाती घेणे आवश्यक आहे. नाशिक मुंबई प्रवास हा दोन तीन तासात होत होता. आता मात्र ५ तासांहून अधिक वेळ प्रवासासाठी लागत आहे.

शेतकऱ्यांना मदत देण्याची सर्व विभागांची सामूहिक जबाबदारी

राज्यात गेल्या दीड महिन्यात १३७ शेतकऱ्यांची आत्महत्या झाली असून २३ दिवसात ४६ आत्महत्या मराठवाड्यात झाल्याचा बातम्या देखील प्रसिद्ध झालेले आहेत. शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट झाली असून शेतकऱ्यांना अधिक मदतीची आवश्यकता आहे राष्ट्रीयकृत बँकांकडून देखील शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची जबाबदारी केवळ एकट्या कृषी विभागाची नसून राज्यातील महसूल आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, यासह विविध विभागांची ही जबाबदारी असून सर्वांनी एकत्रित येऊन शेतकऱ्यांना योग्य ती मदत लवकरात लवकर देण्याची आवश्यकता आहे तरच शेतकऱ्यांना न्याय मिळू शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.