‘फडणवीसांनी पुण्यातून फक्त अर्ज भरायचा आहे, जिंकवण्याचं काम ब्राह्मण महासंघ करणार’

पुणे – भाजपाने (BJP) नुकतीच केंद्रीय संसदीय समिती तसेच केंद्रीय निवडणूक समितीची घोषणा केली. यात केंद्रीय निवडणूक समितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना स्थान देण्यात आले आहे.याबाबत फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असताना आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने (Akhil Bharthiya Brahman Mahasangh) केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांना पत्र लिहून त्याद्वारे ही मागणी करण्यात आली आहे.

नेमकं काय म्हटलं आहे या पत्रात ?

संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीत देवेंद्र फडणवीस यांना आपण स्थान दिलंत त्याबद्दल अभिनंदन. देवेंद्र फडणवीस कुशल राजकारणी असून, मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी हे सिद्ध केलं आहे. ते भाजपाचं भविष्य आहेत. नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपाला सक्षम नेतृत्व देणाऱ्यांमध्ये जी काही दोन-तीन नावे आहेत, त्यात देवेंद्र फडणवीस यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. एक महिन्यापूर्वी त्यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास भाग पाडण्यात आल्याने धक्का नक्कीच बसला होता. पण आता घेतलेल्या निर्णयाने थोडासा दिलासा मिळाला आहे. या निवडीसोबत राष्ट्रीय कार्यामध्ये फडणवीसांच्या कामाला सुरुवात झाली आहे असं मानलं जाऊ शकतं.

पुण्यातील ब्राह्मण महासंघ २००९ मध्ये काँग्रेसच्या सुरेश कलमाडींसोबत उभा होता. २०१४ मध्ये अनिल शिरोळे (Anil Shirole) आणि २०१९ मध्ये गिरीष बापट (Girish Bapat) यांना पाठिंबा दिला होता. त्याचे परिणाम तुमच्यासमोर आहेत. त्यामुळे फडणवीसांसारख्या राष्ट्रीय नेतृत्वासाठी ही सुरक्षित जागा आहे. फडणवीसांना फक्त अर्ज भरायचा आहे, जिंकवण्याचं काम ब्राह्मण महासंघ करणार,” असा शब्दही त्यांनी दिला आहे.

“अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी (Atal Bihari Vajpayee, Narendra Modi) यांच्यानंतर नेतृत्वाची ही परंपरा देवेंद्र फडणवीस कायम राखतील असा विश्वास आम्हाला वाटतो. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ कोणत्याही पक्षाचे समर्थन करत नाही. तरीही राष्ट्रहितासाठी आमचा आग्रह आहे.