सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष करून शरद पवारांनी अजितददादांचे पंख कसे छाटले? 

Mumbai – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज (१० जून) पक्षाच्या वर्धापन दिनी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमावेळी मोठी घोषणा केली आहे. प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदी निवड केली आहे. तसेच राष्ट्रवादीतील इतर नेत्यांवरही जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. मात्र अजित पवार यांच्यावर कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही.

अजित श्पावारांच्या राजकारणातील प्रवेशानंतर 16 वर्षांनी सुप्रिया सुळे यांनी  राजकारणात प्रवेश केला, मात्र आता त्या अजित पवारांच्या (Ajit Pawar) पेक्षाही अधिक शक्तिशाली नेत्या बनल्या आहेत. कार्याध्यक्ष बनलेल्या सुप्रिया आता शरद पवारांनंतर पक्षात नंबर-2 झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रथमच कार्याध्यक्षपदाची निर्मिती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आतापर्यंत महाराष्ट्राशी संबंधित निर्णय शरद पवार अजित पवार, जयंत पाटील यांच्या सल्ल्याने घेत होते. सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर ठेवण्यात आले होते, मात्र आता पवारांनी सुप्रिया यांच्याकडे महाराष्ट्राची कमान दिली आहे.

कार्याध्यक्षासोबतच सुप्रिया यांच्याकडे महाराष्ट्र, हरियाणा आणि पंजाबचीही जबाबदारी देण्यात आली आहे. प्रभारी असल्याने सुप्रिया स्वतः तिकीट वाटपापासून अनेक महत्वाचे निर्णय घेऊ शकतील. एवढेच नाही तर महाराष्ट्र राष्ट्रवादीचे सर्व नेते सुप्रिया सुळे यांना रिपोर्ट करतील. अजित पवार यांच्याकडे महाराष्ट्राची व सुप्रिया यांच्याकडे महाराष्ट्र वगळता संपूर्ण देशाची कमान सोपवावी, अशी सूचना करण्यात आली होती, मात्र शरद पवार यांनी अजित पवारांऐवजी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया यांना कार्याध्यक्ष केले आहे. प्रफुल्ल पटेल प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजकारणात कमी सक्रिय राहतात अशा परिस्थितीत शरद पवार यांनी अजित यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला आहे हे उघड आहे.

अशा स्थितीत शरद पवारांच्या या खेळीमुळे सुळे राष्ट्रवादीत ताकदवान मानल्या जात आहेत. अजित पवारांच्या तुलनेत वारसाहक्कातील त्यांचा दावाही अधिक भक्कम झाला आहे. दरम्यान, अजित पवार यांनी सुप्रिया यांना कार्याध्यक्ष बनवल्याबद्दल आणि स्वतःला कोणतेही पद न मिळाल्याबद्दल भाष्य करण्यास नकार दिला आहे. मात्र, त्यांनी ट्विट करून सुप्रिया आणि प्रफुल्ल पटेल यांचे अभिनंदन केले आहे.