गनिमी कावा आणि फितुरी यातला फरक संजय गायकवाड यांना कळतो का? राष्ट्रवादीचा सवाल

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा आणि फितुरी यातील फरक आमदार संजय गायकवाड यांना कळतो का? असा संतप्त सवाल करत त्यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची मालिका भाजपने व शिंदेसरकारने स्विकारली का अशी शंका आता जनतेच्या मनात येत आहे असेही महेश तपासे म्हणाले.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाच आणि आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनीदेखील मुख्यमंत्र्यांनी केलेले बंड हे शिवरायांच्या गनिमी काव्यासारखे होते असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे त्याचा निषेध महेश तपासे यांनी केला आहे.

वास्तविक छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काय आहे. त्यांचा ‘गनिमी कावा’ काय आहे. त्यामागे इतिहास काय आहे हे संजय गायकवाड व शिंदे – फडणवीस सरकारने वाचण्याची आवश्यकता आहे असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला आहे.

राज ठाकरे यांना स्वतः चे ध्येयधोरण नसल्यामुळे त्यांच्या पक्षाला कुठल्याच निवडणुकीत यश मिळत नाही त्या नैराश्यातून पवारसाहेबांवर ते बोलत असल्याची टीका महेश तपासे यांनी केली आहे. निवडणूका आल्या की शरद पवारसाहेब यांचे नाव घेतल्याशिवाय बातमी बनत नाही हे समीकरण राज ठाकरे यांना कळाले आहे असा टोलाही महेश तपासे यांनी राज ठाकरे यांना लगावला.

छत्रपती शिवाजी महाराजांचे पवारसाहेब नाव घेत नाही असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले आहे ते त्यांचे वक्तव्य चुकीचे आहे, लोकांची दिशाभूल करणारे आहे. पवारसाहेबांचे व्यक्तीमत्व काय आहे हे संबंध महाराष्ट्राला माहीत आहे असेही महेश तपासे यांनी स्पष्ट सांगितले.