आदित्य ठाकरेंना हवे असल्यास मी त्यांना ट्युशन द्यायला तयार आहे – आशिष शेलार

मुंबई – आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) अभ्यास करून बोलतील अशी अपेक्षा होती. पण ते निर्बुद्धासारखे बोलत आहेत, हे दुर्दैव आहे. एका युवा कार्यकर्त्याने काही प्राथमिक गोष्टींचा अभ्यास करून बोलावे, हे अभिप्रेत आहे. पण त्यांचे बोलणे ऐकल्यावर त्यांना प्राथमिक शाळेत परत पाठवावे लागेल, अशाप्रकारे निर्बुद्ध असे त्यांचे बोलणे आहे, अशी टीका भाजपच्या आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली आहे.

मेट्रो ३, ६ आणि १० यांचे एकत्रित कारशेड असावे, ही भूमिका आदित्य ठाकरे तुमच्या सरकारची होती. यासाठी तुमच्या पिताश्रींनी एक समिती नेमली. त्याचे सौनिक समिती असे नाव होते. त्या समितीचा अहवाल स्पष्टपणे सांगत होता की, मेट्रो तीनचे कारशेड आरेमध्येच करणे सोयीस्कर आहे. हा अहवाल तुमच्या पिताश्रींनी नेमलेल्या समितीचाच आहे. आरेमध्ये कारशेड केलेला खर्च पाण्यात घालून कांजूरमार्गमध्ये सर्वांचे कारशेड बांधण्याचा खर्च वेगळा करावा लागला असता. यात अक्कल आणि शहाणपणा कुठे आहे?

कुठल्याही प्रकल्पासाठी शासकीय आणि आर्थिक पातळीवर परवडतील असे निर्णय घ्यायचे असतात. जागा मिळाली तिथे कारशेड करा, हे धोरण अहंकारी असे आहे. आज आरेचे कारशेड पूर्ण झाल्यामुळे आज वर्षाअखेरीस मिळणारी मेट्रो ठाकरेंच्या अहंकारामुळे मिळालीच नसती. ठाकरे पिता-पुत्रांच्या अहंकारामुळे दररोज साडे पाच कोटींचे नुकसान मागच्या अडीच वर्षांपासून होते आहे. हा दररोजचा साडे पाच कोटींचा तोटा ठाकरे पिता-पुत्र कोणत्या कोषातून देणार आहेत. याचे उत्तर त्यांनी द्यावे.

१५ एकरच्या बाबतीत आताच्या सरकारने घेतलेली भूमिका व्यवहार्यता तपासून घेतलेली आहे. मेट्रो ३ चे काम पूर्ण होऊन अन्य कामाला मदत करणारी आहे. दररोजचा साडे पाच कोटीचा तोटा भरून काढणारी आहे. आरेमध्ये आणि इंटिग्रेटेडमध्ये नव्याने झालेला खर्च यापासून वाचविणारी अशी राज्य सरकारची भूमिका आहे. आदित्य ठाकरेंना हवे असल्यास मी त्यांना ट्युशन द्यायला तयार आहे.