भाजपाचा सत्तेतून आलेला उर्मटपणा मला मान्य नाही म्हणून आज मी राऊतांची बाजू घेईन – चौधरी 

मुंबई – ED ने शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना काल रात्री मनी लाँड्रिंग (Money laundering) प्रकरणात अटक केली. त्यांना आज  न्यायालयात हजर केले जाईल, जिथे एजन्सी त्याची कोठडी मागणार आहे. त्याच्या अटकेपूर्वी, ईडीने राऊतच्या भांडुप निवासस्थानाची नऊ तासांहून अधिक काळ झडती घेतली आणि नंतर मग मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

दरम्यान, एका बाजूला हे सर्व घडत असताना आता स्वप्ना पाटकर (Swapna Patkar) यांना धमकावल्याप्रकरणी देखील संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकोला पोलीस ठाण्याच राऊतांवर गुन्हा दाखल झाला. स्वप्ना पाटकर यांनी धमकावल्याची तक्रार केली होती. त्यावर शनिवारी राऊतांवर एनसी दाखल करण्यात आली होती. मात्र किरीट सोमय्या यांनी काल पोलीस ठाण्यात धाव घेऊन एफआयआर (FIR) दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर राऊतांवर 504 आणि 509 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आली.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी (Vishwambhar Chaudhary) यांनी या सर्व घडामोडींवर भाष्य केले आहे. ते म्हणाले, संजय राऊतांवर टीकेच्या माझ्या अनेक पोस्ट्स फेसबुकवर आहेत. संजय राऊतांनी भ्रष्टाचार केला असेल तर त्यांना कडक शिक्षा व्हावी असं म्हणणारा मी पहिला असेन. पण भाजपाचा (BJP) सत्तेतून आलेला उर्मटपणा मला मान्य नाही म्हणून आज मी राऊतांची बाजू घेईन. लोकशाहीत सत्ताधारी राजे नसतात. कायदा समान असेल तर पक्ष न पाहता कारवाया करणं ईडीचं (ED) कर्तव्य आहे, ईडी आमची पगारी यंत्रणा आहे, आम्ही त्यांचे पगार करतो. पण आम्ही निवडून दिलेले इतके उद्धट झाले की ते ईडीला स्वतःची दासी समजून उतमात करायला लागले.

भाजपात गेले की ईडीच्या चौकशीचं काय होतं पुढे? एसीबीनं किती जणांना क्लीनचिटा वाटल्या यांच्या सांगण्यावरून? राणे, कृपाशंकर यांच्या चौकश्या कशा थांबल्या भाजपात गेल्यागेल्या? कोणत्या नैतिक आधारावर बंगारू लक्ष्मण आणि मोदी- शहांचा (Narendra Modi – Amit Shah) हा पक्ष भ्रष्टाचाराला विरोध वगैरे थापा मारून फक्त विरोधी पक्ष संपवतो? हे प्रश्न माझ्यासमोर एक नागरिक म्हणून उभे आहेत.

ईडी पासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत (Supreme Court) सर्व काही ‘वापरून’ लोकशाहीच ठार मारली जात असतांना आपण स्वस्थ बसलो तर काळ आपल्याला माफ करणार नाही. हा लढा आपला एकट्या- दुकट्याचा नाही. हा लढा मोदी – शहा विरूद्ध भारताची लोकशाही (Democracy of India) असा आहे, ज्यांना ज्यांना याचं भान आहे ते ते आज आवाज उठवत राहतील. भाजपा महाशक्ती नसून लोक महाशक्ती आहेत हे आपण आपल्या दत्तक मुख्यंमत्र्यांसह सगळ्यांना दाखवून देणं आवश्यक आहे. असं चौधरी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये (Facebook post) म्हटले आहे.