ICICI Bank Loan Scam: व्हीडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत यांना सीबीआयकडून अटक

मुंबई – बँक कर्ज फसवणूक प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय) मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी सीबीआयने व्हिडिओकॉनचे मालक वेणुगोपाल धूत याला अटक केली आहे. यापूर्वी या प्रकरणी सीबीआयने आयसीआयसीआय बँकेच्या माजी एमडी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली होती. (ICICI Bank Loan Scam: Venugopal Dhoot of Videocon arrested by CBI).

चंदा कोचर आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख असताना त्यांनी व्हिडिओकॉन समूहाला कर्ज दिले, असा आरोप आहे. या बदल्यात चंदा यांचे पती दीपक कोचर यांच्या नु रिन्युएबल कंपनीला व्हिडिओकॉनकडून गुंतवणूक मिळाली. व्हिडिओकॉन ग्रुपला 3,250 कोटी रुपयांचे बँक कर्ज दिल्याप्रकरणी सीबीआयने गेल्या आठवड्यात ICICI बँकेच्या माजी एमडी आणि सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे दीपक कोचर यांना अटक केली होती. यानंतर मुंबईतील विशेष न्यायालयाने दोघांनाही तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली.

2012 मध्ये व्हिडिओकॉन ग्रुपला आयसीआयसीआय बँकेने कर्ज दिले होते. जे नंतर एनपीए झाले आणि नंतर त्याला "बँक फ्रॉड" म्हटले गेले. सप्टेंबर 2020 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने दीपक कोचरला अटक केली. खरं तर, 2012 मध्ये, चंदा कोचर यांच्या नेतृत्वाखालील ICICI बँकेने व्हिडिओकॉन समूहाला 3,250 कोटींचे कर्ज दिले आणि सहा महिन्यांनंतर वेणुगोपाल धूत यांच्या मालकीच्या मेसर्स सुप्रीम एनर्जीने मेसर्स न्यूपॉवर रिन्युएबल्सला 64 कोटींचे कर्ज दिले. ज्यात दीपक कोचर यांचा ५०% हिस्सा आहे.

आयसीआयसीआय बँक आणि व्हिडिओकॉनचे भागधारक अरविंद गुप्ता यांनी पंतप्रधान, रिझर्व्ह बँक आणि सेबी यांना पत्र लिहून व्हिडिओकॉनचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत आणि आयसीआयसीआय सीईओ आणि एमडी चंदा कोचर यांच्यावर एकमेकांची बाजू घेत असल्याचा आरोप केला आहे. धूत यांच्या कंपनी व्हिडिओकॉनला आयसीआयसीआय बँकेकडून 3250 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आणि त्या बदल्यात धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्याद्वारे चालवल्या जाणाऱ्या नुपॉवर या पर्यायी ऊर्जा कंपनीमध्ये पैसे गुंतवले.