‘पुष्पा द राइज’ची परदेशातही हवा! ‘या’ दिवशी रशियात रिलीज होतोय अल्लू-रश्मिकाचा चित्रपट

Pushpa The Rise : गेल्या काही वर्षांपासून लोकांमध्ये साऊथ चित्रपटांची क्रेझ पाहायला मिळत आहे. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द राइज’ला भारतातच नाही तर परदेशातही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट आता रशियात रिलीज होण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.

अखिल भारतीय स्तरावर प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेला ‘पुष्पा: द राइज’ हा ब्लॉकबस्टर चित्रपट येत्या ८ डिसेंबर रोजी रशियात रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोमवारी ही घोषणा केली आहे. रशियाच्या भारतीय चित्रपट महोत्सवाचा एक भाग म्हणून अभिनेता अल्लू अर्जुनच्या चित्रपटाचा रशियन भाषेतील प्रीमियर मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग येथे अनुक्रमे १ आणि ३ डिसेंबर रोजी होणार आहे.

रशियातील भारतीय चित्रपट महोत्सवाचे पाचवी पर्व १ डिसेंबर रोजी ‘पुष्पा: द राइज’ चित्रपटाने सुरू होईल. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना, दिग्दर्शक सुकुमार बंदरेड्डी आणि निर्माता रविशंकर मॉस्कोमधील ओशनिया शॉपिंग सेंटरमध्ये होणाऱ्या या चित्रपट महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत.

६ डिसेंबरपर्यंत चालणारा भारतीय चित्रपट महोत्सव रशियातील २४ शहरांमध्ये आयोजित केला जाणार आहे. ‘आरआरआर’, ‘माय नेम इज खान’, ‘दंगल’, ‘वॉर’ आणि ‘डिस्को डान्सर’ सारखे इतर भारतीय चित्रपटही सहा दिवस चालणाऱ्या महोत्सवात दाखवले जाणार आहेत.