काळाचा घाला! पॅराग्लायडिंग करताना ८०० फुटावरून खाली कोसळून साताऱ्यातील युवकाचा मृत्यू

सातारा| नाताळ सणाची सुट्टी साजरी करण्यासाठी मित्रांसह हिमाचल प्रदेशातील कुलू-मनालीला गेला. तिथे पहिल्यांदाच पॅराग्लायडिंगचा थरार अनुभवण्याच्या प्रयत्नात अवकाशात भरारी घेतली आणि तो गेला तो कायमचाच. साताऱ्यातील ३० वर्षीय युवकासोबत ही दुर्देवी घटना घडली आहे.

हिमाचल प्रदेशातील कुलू-मनाली (Kullu Manali) येथे पॅराग्लायडिंग (Paragliding in Kullu-Manali) करताना पॅराशूटचा बेल्ट निसटून खाली पडल्यामुळे ३० वर्षीय युवक सुरज शहा याचा मृत्यू झाला असल्याची दुर्देवी घटना घडली आहे. सुरज शहा (Suraj Shah)सातारा (Satara) जिल्ह्यातील शिरवळ (Shirwal) येथील आहे. या घटनेमुळे शिरवळ शहरावर शोककळा पसरली आहे. सूरजच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

सूरज आपल्या मित्रांसह नाताळाची सुट्टी साजरी करण्यासाठी हिमाचल प्रदेशमध्ये गेला होता. सुरजचे वडील उद्योजक आहेत. सुरज मित्रांसोबत तो ख्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी कुलू-मनालीला गेला होता. सुरज सुमारे ८०० फुटावरून खाली पडला असल्याचे सांगण्यात येते. या अपघातानंतर सूरजसोबत असणाऱ्या त्याच्या मित्रांना मोठा धक्का बसला आहे. सूरजचा अपघाती मृत्यू सेफ्टी बेल्ट निसटल्याने झाल्याने त्यावर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलूमधील पॅराग्लायडिंग साईट डोभी येथे हा अपघात झाला. डोभी येथील पॅराग्लायडिंग साईटवरून पायलटने उड्डाण घेतले. मात्र, थोड्याच वेळानंतर अपघात झाला. उंचावरून कोसळलेल्या सूरजचा मृतदेह सफरचंदाच्या शेतात आढळला. स्थानिकांनी तातडीने त्याला आणि पायलटला गंभीर जखमी अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी सूरजला मृत घोषित केले. यावेळी पायलटदेखील जखमी झाला असल्याची माहिती आहे.

दरम्यान, अनेकदा सांगूनही सूरज शहा सतत सेफ्टी बेल्टला हात लावत होता. त्यामुळे सेफ्टी बेल्ट निसटला आणि तो वरून खाली कोसळला. सेफ्टी बेल्ट उघडल्यानंतरही पायलटने प्रयत्न करत त्याला आपल्या हाताच्या साहाय्याने वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे वजन अधिक असल्याने वाचवण्यास अपयश आले असल्याचे पायलटने सांगितले. पॅराशुट पायलटवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मनाली पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.