INDvsSL: पावसामुळे आशिया चषकाचा अंतिम सामना रद्द झाल्यास कोण जिंकेल ट्रॉफी? असा ठरवला जाईल विजेता

Asia Cup Final: आशिया चषक 2023 चा अंतिम सामना रविवारी (17 सप्टेंबर) कोलंबोतील आर प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका  (India vs sri Lanka) यांच्यात होणार आहे. रोहितची पलटण 8व्यांदा आशिया चॅम्पियन बनण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. त्याचबरोबर दासुन शनाकाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेचा संघ विजेतेपद राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.

मात्र, कोलंबोतील अंतिम सामन्याच्या दिवशी पावसाची दाट (Colombo Weather Report) शक्यता आहे. अशा परिस्थितीत विजेतेपदाचा सामना पावसामुळे वाहून गेला, तर विजयी संघ कसा ठरवला जाणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तुमच्या मनात निर्माण होणाऱ्या या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ या.

फायनलमध्ये पाऊस पडला तर?
भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील अंतिम सामन्याच्या दिवशी पावसाची 80 टक्के शक्यता आहे. म्हणजेच सुपर-4 फेरीप्रमाणेच विजेतेपदाच्या सामन्यातही पाऊस येत-जात राहणार आहे. हे लक्षात घेऊन अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. म्हणजे रविवारी पावसामुळे अंतिम सामना पूर्ण झाला नाही, तर सोमवारीही सामना पूर्ण करण्यासाठी उपलब्ध होईल.

रिझर्व्ह डेच्या दिवशीही पाऊस आल्यास विजेता कोण?
आता रविवार आणि सोमवार या दोन्ही दिवशी कोलंबोमध्ये मुसळधार पाऊस पडला, तर विजेता कसा ठरणार? राखीव दिवशीही दिवसभर पाऊस पडला आणि एकही चेंडू खेळला गेला नाही, तर दोन्ही संघ ट्रॉफी शेअर करतील. नियमांनुसार, अंतिम सामन्याचा निकाल मिळविण्यासाठी, दोन्ही संघांना किमान 20-20 षटके खेळणे आवश्यक आहे.

महत्त्वाच्या बातम्या-