महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्का लागल्याचं दाखवलं तर मी राजकारण सोडेन – देशपांडे

 मुंबई – जवळपास तीन आठवड्यांपासून ‘नॉट रीचेबल’ असणारे मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी (MNS leaders Sandeep Deshpande and Santosh Dhuri) या दोघांना मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन (Pre-arrest bail)  मंजूर केला आहे. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यासोबतच न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या संतोष साळवी आणि देशपांडे यांच्या गाडीच्या चालकाला जामीन मंजूर करण्यात आला आहे. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी या दोघांनी पोलिसांना गुंगारा देऊन पळण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांच्यावर आहे. यादरम्यान, एक महिला पोलीस कर्मचारी खाली पडली. त्यानंतर पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढल्या प्रकरणी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, “आमच्यावरील गुन्हा खोटा होता. खोट्या गुन्ह्यासाठी महाराष्ट्राचे पोलीस आम्हाला शोधत होते. मीडियामधील फूटजे आमच्या वकिलांनी कोर्टात दाखवलं. त्यावरुन स्पष्ट झालं की आम्ही कोणताही गुन्हा केला नव्हता. आम्ही सरकारविरोधात बोलू नये म्हणून सरकारने दबाव बनण्यासाठी हे सगळं केलं. आमचा कायद्यावर आणि न्यायालयावर विश्वास होता. त्यामुळे आम्हाला न्याय मिळाला,” असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्का लागल्याचं दाखवलं तर मी राजकारण सोडेन असं देखील ते म्हणाले.

माझ्याकडे एका न्यूज चॅनलचं फूटेज आहे. त्याचे स्क्रीन शॉट काढले आहेत. बोलेसे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याचा महिला पोलिसाला धक्का लागला. अशाप्रकारे सरकारने पोलीस स्टेशनवर दबाव बनवून फूटेजमधले शॉट्स कट करुन काहीतरी केलं. गुन्हे दाखल करुन राजकीय सूड उगवला, असं देशपांडे म्हणाले