राज ठाकरे यांच्या या नामुष्कीला भाजपाच जबाबदार आहे; अयोध्या दौरा रद्द होताच कॉंग्रेसची टीका

मुंबई – गेले अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा अखेर स्थगित झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत ट्वीट (Tweet) करून माहिती दिली आहे. मात्र, पुण्यातील सभा होणार असून मनसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राज यांनी ट्वीटमध्ये केले आहे.

राज यांची तब्बेत ठीक नसल्याने दौरा रद्द करण्यात आल्याचं सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आलंय. पुण्यातील सभेमध्ये आपण यावर सविस्तर बोलणार असल्याचं राज यांनी स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे हे अचानक पुणे दौऱ्यावर मुंबईला परतल्यापासूनच त्यांच्या अयोध्या दौऱ्याबद्दल चर्चांना उधाण आलं होतं. अखेर आज या चर्चांना पूर्णविराम देत राज यांनी दौरा स्थगित झाल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केलंय.

या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी भाजपला (BJP) यानिमित्ताने लक्ष्य केले आहे. ते म्हणाले, राज ठाकरे यांच्या या नामुष्कीला भाजपाच जबाबदार आहे. सुरुवातीला हवा भरण्याचे काम भाजपानेच केले. पण हिंदूत्व व्होट बँकेत वाटेकरी नको असल्यानेच औरंगाबाद सभेआधीच विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने (Bajrang Dal) काढता पाय घेतला. उत्तर भारतीय मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी जाणिवपूर्वक मनसेची कुचंबणा केली.असं त्यांनी म्हटले आहे.