महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर एसटी सेवा तूर्तास बंद

  मुंबई – महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान सुरू असलेल्या सीमावादाच्या दरम्यान पोलीस सुरक्षेच्या सतर्कतेनंतर महाराष्ट्र सरकारने कर्नाटकला जाणारी बस सेवा बंद केली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) बुधवारी सकाळी हा निर्णय घेतला.

महाराष्ट्रातील विविध भागांतून कर्नाटकात जाणाऱ्या आणि येणाऱ्या 145 एसटी फेऱ्या मंगळवारी रद्द करण्यात आल्या. कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी यांसह अन्य काही जिल्ह्यांतून कर्नाटकसाठी दररोज 330 एसटी फेऱ्या होतात.

तेवढ्याच फेऱ्या पुन्हा कर्नाटककडे रवाना होतात. कन्नड संघटनांकडून करण्यात आलेल्या आंदोलनामुळे एसटीच्या वाहतुकीवर परिणाम झाला. एकूण 145 एसटी फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या परिवहन सेवाही थांबवण्यात आल्या आहेत.

पोलिस विभागाच्या सुरक्षेच्या सुचनेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याची पुष्टी राज्य परिवहन विभागाने केली. अलर्टनुसार, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाशी संबंधित आंदोलनादरम्यान कर्नाटकमध्ये बसेसवर हल्ला होऊ शकतो. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी फोनवरून या विषयावर चर्चा केली आणि दोन्ही राज्यांमध्ये शांतता, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यावर सहमती दर्शवली.

याबाबत सीएम बोम्मई यांनी ट्विटरवर लिहिले आहे की ,  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी माझ्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली, दोन्ही राज्यात शांतता आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी यावर आम्ही दोघांचेही एकमत झाले आहे.