Video: आशिया कपमध्ये भारत अन् बांगलादेशचे खेळाडू चालू सामन्यात मैदानावर भिडले अन्…

श्रीलंकेत झालेल्या इमर्जिंग आशिया चषक 2023 च्या (Emerging Asia Cup 2023) दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारत-A (IND-A) ने बांगलादेश-A (BAN-A) चा 51 धावांनी पराभव केला. कर्णधार यश धुलच्या (66) अर्धशतकी खेळीमुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना 211 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संपूर्ण संघ 34.2 षटकांत 160 धावा करून गडगडला. निशांत सिंधूने 5 बळी घेतले. या सामना विजयासह भारतीय संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. आता रविवारी पाकिस्तान अ विरुद्ध भारतीय संघाचा अंतिम सामना रंगेल.

या सामन्यादरम्यान बऱ्याचदा भारत आणि बांगलादेश संघाचे खेळाडू आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले. त्याचे झाले असे की, सौम्या सरकार आऊट झाला आणि त्याने भारतीय खेळाडूंशी वाद घालण्यास सुरुवात केली. भारतीय फिरकीपटू युवराजसिंह डोडियाच्या चेंडूवर निकिन जोसने सौम्या सरकारचा सर्वोत्तम झेल घेतला. भारतीय खेळाडूंनी ते सेलिब्रेशन करायला सुरुवात केली आणि त्यातला एक सौम्या सरकारच्या पुढे गेला, ज्यामुळे बांगलादेशी फलंदाज संतप्त झाला. काही सेकंदात सौम्या सरकार आणि भारतीय खेळाडू हर्षित राणा यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.

परिस्थिती आणखी बिघडण्याआधी टीम इंडियाचा युवा फलंदाज साई सुदर्शन आणि अंपायर मध्ये आले. सुदर्शनने अनुभवी बांगलादेशी फलंदाज सरकारला हात जोडून प्रकरण शांत करत पॅव्हेलियनमध्ये परतण्याचा सल्ला दिला.