Viral Video: चालत्या ट्रेनखाली झोपला व्यक्ती, मात्र पुढे जे झाले ते आहे फारच इंटरेस्टींग…

‘किस्मत मेहरबान तो गधा पहलवान’ ही म्हण सर्वांना परिचित आहे. सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओतील व्यक्तीलाही ही म्हण लागू होते. हा व्यक्ती शॉर्टकट मारण्याच्या नादात फसतो आणि अख्खी धावती मालगाडी त्याच्या अंगावरून जाते. मात्र त्याच्या अंगाला साधे खरचटतही नाही. उलट तो मालगाडी निघून गेल्यानंतर आपल्या कृतीवर खदखदून हसतो. नेमके काय आहे हे प्रकरण, सविस्तरपणे जाणून घेऊ…

काय आहे व्हिडिओत?
सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओतील ही घटना बिहारच्या बागलपूरमधील आहे. बागलपूर जिल्ह्यातील कहालगाव रेल्वे स्टेशनचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रेल्वे ट्रॅकच्या मध्यभागी एक प्रवासी पोटावर झोपलेला आहे आणि एक मालगाडी त्याच्यावरून जात आहे. जेव्हा मालगाडी निघून जाते, तेव्हा ती व्यक्ती उठते आणि हसत निघून जाते.

यादरम्यान, मालगाडीच्या बाजूला गर्दी करून उभे असलेले इतर लोक त्याला असेच झोपून राहण्याचा सल्ला देत आहेत. मालगाडी निघून गेल्यानंतर ही व्यक्ती सुखरूप बाहेर आल्यावर लोकांनीही दीर्घ श्वास घेतल्याचे दिसत आहे.

नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, सदर व्यक्ती कहालगाव रेल्वे स्थानकावरून प्रवासासाठी निघाली होती. ज्या ट्रेनने त्याला प्रवास करायचा होता ती प्लॅटफॉर्म क्रमांक दोन किंवा तीनवर उभी होती, जी लवकरच निघणार होती. त्यानंतर त्या व्यक्तीला वाटले की ट्रेन पकडण्यासाठी शॉर्टकट मार्ग शोधला पाहिजे. म्हणून तो व्यक्ती रेल्वे ट्रॅकवरून त्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी निघाला. पण मालगाडी मध्येच उभी होती. हे पाहून पटकन त्याने रेल्वे ट्रॅकवरून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी मालगाडी सुटली आणि तो खाली अडकला.