‘त्या मुलीची जात कुठली विचारणाऱ्या सडक्या बुद्धीजीवांनो…’, लेशपाल जवळगेची इंस्टा स्टोरी चर्चेत

पुण्यात काल दर्शना पवार हत्या प्रकरणाची (Darshana Pawar Murder Case) पुनरावृत्ती होता होता राहिली. कॉेलज तरुणीवर एमपीएससी करणाऱ्या तिच्या मित्राने सदाशिव पेठेत कोयत्याने (MPSC Girl Attacked) हल्ला केला.

या हल्ल्यावेळी त्या मुलीसोबत तिचा आणखी एक मित्र होता. हल्ला झाल्यानंतर ही तरुणी जीव मुठीत धरून धावायला लागली. मात्र तिच्या मागे कोयता घेऊन धावणार्‍या तरूणाला पाहुन कोणीच मदतीला पुढ आलं नाही. जखमी अवस्थेत ती मुलगी धावत होती. एवढ्यात लेशपाल जवळगे (Leshpal Javalge) नावाच्या तरुण त्या मुलीच्या मदतीला धावला. कोयता हातात असलेला तरुण मुलीच्या डोक्यात वार करणार एवढ्यात लेशपाल जवळगेने कोयता पकडला आणि हल्लेखोर तरुणाला रोखले. त्यानंतर इतर लोक पुढे आले आणि हल्लेखोर तरुणाला चोप दिला. त्यानंतर पोलीसांनी हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतलय.

एमपीएससी करणाऱ्या लेशपालने तरुणीची वेळीच मदत केल्याने तिचा जीव वाचला. त्याच्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होतंय. राजकारण्यांपासून ते सर्वसामान्यांपासून सर्वांनी त्याची कौतुक केलंय. परंतु, त्याला इन्स्टाग्रामला वेगळेच मेसेज येऊ लागले आहेत. या मुलाची आणि मुलीची काय जात होती, असे प्रश्न विचारले जात असल्याचा दावा लेशपालने केलाय. त्याने यासंदर्भात इन्स्टाग्रामला स्टोरी ठेवली आहे.

तो इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हणतोय की, “त्या मुलीची आणि मुलाची जात कुठली होती असं मला DM करून विचारणाऱ्या सडक्या बुद्धीजीवांनो विनंती आहे की ते मेसेज डिलिट करा. ना तुम्ही तुमच्या जातीचे होऊ शकता. ना ही समाजाचे. कीड लागली आहे तुमच्या वरचा थोड्याफार असलेल्या भागाला.”