घरच्या परिस्थितीमुळे झाडू मारण्याचे काम केले, रिंकू सिंगच्या संघर्षाची कहाणी वाचून पाणावतील डोळे

अहमदाबाद| कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स (KKRvsGT) संघात झालेला आयपीएल २०२३ मधील १३वा सामना अतिशय थरारक राहिला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरात संघाने ४ बाद २०४ धावा केल्या होत्या. गुजरातच्या २०५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याकडून रिंकू सिंग (Rinku Singh) याने शेवटच्या षटकात महत्त्वपूर्ण खेळी करत संघाला ३ विकेट्सने विजय मिळवून दिला. रिंकू सिंगने शेवटच्या षटकात सलग ५ षटकार ठोकत समस्त क्रिकेटरसिकांचे लक्ष वेधले आहे. मात्र रिंकूसाठी इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.

रिंकू अतिशय सामान्य कुटुंबातून आलेला मुलगा आहे. त्याच्या घरची परिस्थिती इतकी बिकट होती की, त्याला झाड-लोट करण्याची नौकरी करावी लागली होती. मात्र आयपीएलने त्याच्या आयुष्याला नवे वळण दिले.

रिंकूचा जन्म १२ ऑक्टोबर १९९७ रोजी अलिगढ, उत्तर प्रदेश येथे झाला आणि तो ५ भावंडांमध्ये तिसरा आहे. रिंकूच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने ते गॅस सिलिंडर डिलिव्हरी करायचे. दुसरीकडे रिंकूला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती, पण आपल्या मुलाने या खेळात वेळ वाया घालवू नये असे वडिलांना वाटत होते. त्यामुळे त्याचे वडील रिंकूला अनेकदा मारायचेही. असे असतानाही रिंकूने क्रिकेट खेळणे सुरूच ठेवले. दिल्लीत खेळल्या गेलेल्या एका स्पर्धेत त्याला बक्षीस म्हणून बाईक मिळाली, जी त्याने वडिलांना दिली. तेव्हापासून वडिलांनी रिंकूवर हात उचलणे बंद केले, मात्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. अशा परिस्थितीत रिंकूने नोकरी करण्याचा निर्णय घेतला.

…जेव्हा रिंकूला झाडू मारण्याचे काम मिळाले
रिंकू फार शिकलेला नव्हता, त्यामुळे त्याला कोचिंग सेंटरमध्ये सफाई कामगाराची नोकरी मिळाली. रिंकूला हे काम करावेसे वाटले नाही आणि त्याने काही दिवसांतच हे काम सोडले. यानंतर रिंकूने आपले लक्ष क्रिकेटवर केंद्रित केले ज्यामुळे त्याचे करिअर उजळू शकेल. मोहम्मद जिओशान आणि मसूद अमीन या दोन व्यक्तींनी रिंकू सिंगच्या कारकिर्दीला नवीन उड्डाण देण्यात मदत केली. मसूद अमीनने लहानपणापासूनच रिंकूला क्रिकेटचे प्रशिक्षण दिले आहे, तर १६ वर्षाखालील ट्रायल्समध्ये दोनदा अपयशी ठरल्यानंतर झीशानने या क्रिकेटरला खूप मदत केली. खुद्द रिंकू सिंगनेही एका मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केला होता.

२०१४ मध्ये रिंकूच्या मेहनतीला अखेर फळ मिळाले जेव्हा त्याला उत्तर प्रदेशसाठी लिस्ट-ए आणि टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. रिंकू सिंगनेही पंजाबविरुद्ध दोन वर्षांनंतर प्रथम श्रेणी पदार्पण केले. त्यानंतर रिंकूने मागे वळून पाहिले नाही आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. आयपीएल २०१७च्या लिलावात रिंकूला किंग्ज इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्स) ने १० लाख रुपयांना विकत घेतले. मात्र, त्या मोसमात त्याला एकच सामना खेळायला मिळाला होता.

२०१८च्या मोसमात, रिंकू सिंगला कोलकाता नाईट रायडर्सने ८० लाख रुपयांना आपल्या संघात समाविष्ट केले होते. तेव्हापासून तो केकेआरशी जोडला गेला आहे. मात्र, आयपीएल २०२१ च्या मोसमात तो गुडघ्याच्या दुखापतीमुळे एकही सामना खेळू शकला नाही. रिंकूला केकेआरने आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात ५५ लाख रुपयांना खरेदी केले होते. आयपीएलमध्ये रिंकूने आतापर्यंत २० सामने खेळले असून २४.९३च्या सरासरीने ३४९ धावा केल्या आहेत. आयपीएल २०२२ मध्ये लखनऊविरुद्धच्या सामन्यात रिंकूने अवघ्या १५ चेंडूत ४० धावा केल्या होत्या, त्यानंतर रिंकूचे नशीब पालटले.