पार्थ पवार कोरेगावमधून विधानसभा निवडणूक लढविणार हे धांदात खोटे आहे – अजित पवार

सातारा – पार्थ पवार यांचा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते विधानसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चा वारंवार होत असतात. सध्या पार्थ पवार कारेगाव विधानसभा निवडणूक लढणार असल्याची कुजबुज सुरु आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी याविषयावर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.

पार्थ पवार कोरेगावमधून विधानसभा निवडणूक लढविणार हे धांदात खोटे आहे, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. तसेच याविषयीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. ते सातारा येथे पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते.

अजित पवार म्हणाले, पार्थ पवार कोरेगावमधून विधानसभा निवडणूक लढविणार हे धांदात खोटे आहे. माध्यमांनीही खूप महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे. अतिरंजित बातम्यांना प्राधान्य न देता समाजात शांतता, जातीय सलोखा राहील आणि समाजात तेढ निर्माण होणार नाही यासाठी माध्यमांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शेवटी माध्यमांची विश्वासार्हताही महत्त्वाची आहे.