‘मुख्यमंत्र्यांच्या भाषणामुळे डोळे पाणावले, इतका प्रांजळ आणि सरळमार्गी राजकारणी आपल्याला प्रथमच दिसतोय’

 मुंबई – महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारवर (MVA) राजकीय संकटाचे ढग दाटले आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  बंडखोर झाल्याने उद्धव ठाकरे सरकार संकटात सापडले आहे. शिंदे यांची बंडखोर वृत्ती पाहता शिवसेनेने त्यांना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हटवले असले तरी या निर्णयांमुळे एकनाथ शिंदे हे कोणत्याही दबावाखाली दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत भावनिक आवाहन केले.

दरम्यान,  माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री पदावर नको असेल तर मी का राहू ? माझ्याशी थेट का बोलत नाही ? सुरतला जाण्याची काय गरज ? आजही समोर येऊन एकाने सांगितले तरी राजीनामा देण्यास तयार. आज मी मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हलवत आहे. पण समोर येऊन बोला.शिवसेनेचे लाकूड वापरुन घाव घालू नका. माझ्या सहकाऱ्यांनी तिकडे जाऊन बोलण्यापेक्षा तोंडावर सांगावं…. आजच मुख्यमंत्रीपद सोडतो. आज राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवतो… जे आमदार गायब आहेत त्यांनी यावं आणि ते पत्र घेऊन जावं.  असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाईव्ह (F.B.Live) नंतर प्राध्यापक हरी नरके (Hari Narke) यांनी एक पोस्ट केली आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी जनतेला उद्देशून आत्ताच केलेले भाषण आरपार भिडले. डोळे पाणावले. इतका प्रांजळ आणि सरळमार्गी राजकारणी आपल्याला प्रथमच दिसतोय. श्री. ठाकरे यांच्याबद्दल ते मुख्यमंत्री होण्याच्या आधी माझ्या मनात खूप दूषित पूर्वग्रह होते. पण ते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी करोनाकाळात (Corona) ज्या कळकळीने महाराष्ट्राचे संगोपन केले ते अतुलनीय होते. त्यांच्यासोबत काम करताना त्यांचे जवळून जे दर्शन झाले ते आदर वाढवणारे होते. आहे. राहील. अशा माणसाने मी मुख्यमंत्रीपद सोडतो, अगदी शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुखपदही सोडतो ही दाखवलेली तयारी खोलवर भिडली. स्पर्शून गेली. सत्ता येईल, जाईल, अशी गुणी माणसं जपायला हवीत. असा कुटुंबप्रमुख फार मोलाचा आहे. पर्याय देणारे नाना फडणीस कोरडे आणि कोते राजकारणी आहेत. असं नरके यांनी म्हटले आहे.