मी हृदयाने मुस्लिम,पण मला हिजाब घालण्याची गरज वाटत नाही – अरुसा परवेझ

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमधून सुरु झालेला हिजाबचा मुद्दा देशभरात चांगलाच चर्चेत आहे. या प्रकरणावरून उलटसुलट चर्चा होत आहेत तसेच राजकीय पक्ष हे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप देखील करत आहे. एकंदरीत या प्रकरणामुळे देशभरातील वातावरण ढवळून निघालेले असताना आता जम्मू काश्मीरमधील बारावीच्या परीक्षेत राज्यात पहिल्या आलेल्या मुलीने हिजाब घालण्यास नकार दिला आहे.

दरम्यान, खऱ्या अर्थाने पुरोगामी भूमिका अरुसा परवेझ असं तिचं नाव असून तिला हिजाब का घातला नाही या गोष्टीवरून ट्रोल केलं जातंय. तिला गळा चिरण्याच्या, ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. आपण मुस्लिम धर्म मानतो, हृदयाने मुस्लीम आहे पण त्यासाठी हिजाब घालायची गरज नसल्याचं सांगत तिने कट्टरवाद्यांना सडेतोड उत्तर दिलंय.

कर्नाटकातील हिजाब घातलेली एक मुलगी ‘अल्ला हू अकबर’चा नारा देत देशभरातील हिजाब समर्थकांची रोल मॉडेल बनली आहे. त्या मुलीचा आदर्श घेऊन जम्मू काश्मीर बोर्ड परीक्षेत पहिल्या आलेल्या अरुसाला हिजाब घालण्याचा सल्ला सोशल मीडियावर दिला जातोय. हिजाब घातला नाही तर तिला ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जातायत. पण ही धाडसी मुलगी ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देते, ‘मी मुस्लिम धर्म मानते, मुस्लिम तत्वांना मानते. पण एक चांगली मुसलमान होण्यासाठी मला हिजाब घालण्याची गरज वाटत नाही.’