घटत्या जन्मदरामुळं जपानची चिंता वाढली; जेष्ठ नागरिकांच्या संख्येत झाली वाढ

जपान : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (PM Fumio Kishida) यांनी घटत्या जन्मदरामुळं (Declining birth rate) जपान (Japan) एक समाज म्हणून प्रगती करू शकत नाही असं म्हटलं आहे. जपानच्या शेजारी देशांसह अनेक देशांमध्ये जन्मदर कमी होत आहे. जपानमध्ये गेल्या काही दशकात सरासरी आयुर्मान वाढलं असल्यानं ही समस्या विशेषत्वानं तीव्र आहे. याचाच अर्थ त्या देशात वृद्ध लोकांची संख्या वाढत असून देशाच्या प्रगतीला हातभार लावण्यात महत्वाची भूमिका असलेल्या कामगारांची संख्या कमी होत आहे.

जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, जपानमध्ये 65 वर्षाहून अधिक वयोगटातील लोकांचं देशाच्या एकंदर लोकसंख्येच्या तुलनेतील प्रमाण 28 टक्के असून या आकडेवारीमध्ये मोनॅकोनंतर जपानचा दुसऱ्या क्रमांक लागतो. जपानच्या संसदेच्या नवीन अधिवेशनाच्या प्रारंभाच्या निमित्तानं धोरणात्मक भाषणात खासदारांशी संवाद साधताना पंतप्रधान किशिदा म्हणाले, की साडेबारा कोटी लोकसंख्या असलेल्या जपानमध्ये गेल्या वर्षीचा जन्मदर आठ लाखांपेक्षा कमी असून 1970 मध्ये ही संख्या 20 लाखांपेक्षा जास्त होती.

पंतप्रधान किशिदा पुढं म्हणाले की, मुलं आणि त्यांचं संगोपन यासंबंधीच्या धोरणांवर लक्ष केंद्रित करणं याला दुय्यम स्थान देता येणार नाही. सरकारनं बालकांशी संबंधित योजनांवर खर्चाची मर्यादा दुप्पट करण्याला त्यांचं प्राधान्य असल्याचं ते म्हणाले. येत्या एप्रिलमध्ये यासाठी नवीन सरकारी संस्था स्थापन करून या समस्येचं निराकरण करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. आपल्या सरकारची धोरणं अशी संस्था सुरू करण्याबरोबरच पालकांच्या सक्षमीकरणासाठी तसंच जगातील तिसऱ्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेची शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी तयार करण्यात आली असल्याचं किशिदा यांनी नमूद केलं.