जसप्रीत बुमराह पुनरागमनासाठी सज्ज; म्हणाला, “विश्वचषकात १० षटके टाकण्याची तयारी”

भारत आणि आयर्लंड (IND vs IRE) यांच्यातील टी-20 मालिकेला शुक्रवारपासून (18 ऑगस्ट) सुरुवात होत आहे. जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) या मालिकेत तीन टी-20 सामने खेळणार आहे. बुमराह 326 दिवसांनंतर भारतीय संघात पुनरागमन करत आहे. बुमराहने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना सप्टेंबर 2022 मध्ये खेळला होता.

आयर्लंडविरुद्धच्या भारताच्या पहिल्या टी20 सामन्याच्या एक दिवस अगोदर बुमराह म्हणाला, “ज्यावेळी दुखापतींना बरे होण्यास वेळ लागतो तेव्हा ते निराशाजनक असू शकते. मी स्वतःवर शंका घेण्याऐवजी तंदुरुस्त कसे व्हावे आणि पुनरागमन कसे करावे याचा विचार करत होतो. विश्वचषकाच्या प्रत्येक सामन्यात पूर्ण 10 षटके टाकण्याची माझी तयारी आहे. यासाठी शरीराला वेळ आणि आदर देणे महत्त्वाचे आहे. मी दुखापतीला कधीही वाईट टप्पा म्हणून घेतले नाही. माझे करिअर संपेल असे वाटले नव्हते. मी उपाय शोधत होतो आणि जेव्हा उपाय आला तेव्हा मला बरे वाटले.”

तो पुढे म्हणाला, “जेव्हा तुम्ही दुखापतीचा सामना करत असता, तेव्हा तुम्ही ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करता, जग काय म्हणत नाही. मला सावरायचे होते. तुम्हाला खेळाचा अधिक आनंद लुटायचा आहे. दुखापतीतून काही ना काही शिकले पाहिजे, या दरम्यान मला कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली. मी त्याकडे सकारात्मकतेने पाहिले. मी क्रिकेटपासून दूर राहिलो. सहकाऱ्यांशी संवाद साधल्यामुळे मला प्रेरणा मिळाली.”