“पवारसाहेबांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला सोडू नये; त्यांना पुर्ण प्रायश्चित्त देण्याचे काम गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी करावे”

मुंबई  – चर्चगेट परिसरातील महिला वसतीगृहात घडलेली घटना अत्यंत गंभीर आहे. अकोल्यातील एका सामान्य कुटुंबातील मुलगी मोठं होण्याचं स्वप्न रंगवते… वडिलांना आपल्या स्वप्नाबद्दल माहिती देते… आणि मुलीला एका वॉचमनच्या अत्याचाराला बळी पडावे लागते यावरून आपली यंत्रणा किती निष्काळजी आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी माध्यमांशी बोलताना आपला संताप व्यक्त केला.

दरम्यान आपण महिला वसतीगृहात नावापुरते वॉचमन ठेवतो की काय? त्याची माहिती घेतली जात नाही. कामापुरता उतारा अशी जी पध्दत आहे त्या पध्दतीचा पुनर्विचार केला पाहिजे असेही जयंत पाटील म्हणाले.

त्या मुलीने पोलीसांना कळवले आणि पोलीसांनी दखल घेतली नाही. सध्या मंत्रालयातून फोन आल्याशिवाय कशाचीच दखल पोलीस घेत नाही. सामान्य माणूस डायरेक्ट पोलीस ठाण्यात गेला आणि वरुन सूचना आल्याशिवाय गुन्हयाची नोंद होत नाही. त्यातलाच हा प्रकार आहे. त्यामुळे पोलिसांचे आणि गृहखात्याचे हे फेल्युअर आहे. महाराष्ट्रात अशा घटना घडायला लागल्या आहेत. कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण राहिलेले नाही अशी परिस्थिती हळूहळू निर्माण झाली आहे असा थेट हल्लाबोलही जयंत पाटील यांनी केला.

मागच्या महिन्यापूर्वी काही लोकांनी दंगली घडवल्या जातील असे दिसायला लागले आहे असे वक्तव्य केले होते आणि आता हळुहळु त्याचा प्रत्यय काही महिन्यात यायला लागला आहे असे सांगतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गृहमंत्री या नात्याने जबाबदारीने सर्वांमध्ये शांतता राहिल अशा पध्दतीनेच पावलं उचलली पाहिजेत. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात दंगल होणार नाही. दोन समाजात तणाव निर्माण होणार नाही याची काळजी ते घेतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

आम्ही उघड बोलू त्यावेळी कळेल. सगळ्या गोष्टी उघड बोलू नये पण पवारसाहेबांनी स्वतः हून आवाहन केले आहे की, असे वातावरण निर्माण होतेय ते चुकीचे आहे याला तात्काळ आळा घालण्याचे काम केले पाहिजे अशा अनिष्ट प्रवृत्ती महाराष्ट्रात परत वाढता कामा नये आज जाणीवपूर्वक काही ठराविक गोष्टीसाठी लोकं गोळा करणं आणि फार मोठ्या प्रमाणात त्याचे प्रदर्शन करणे आणि शहराचे वातावरण बिघडवणे हे काम महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी चालू आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

मुद्दामहूनच पवारसाहेब (Sharad Pawar) जे बोलले नाहीत ज्याबद्दल अजिबात भाष्य केले नाही. अशा खोट्या बातम्या तयार करून प्रसारमाध्यमात देऊन त्यावर पुन्हा अनेकांनी त्यावर बोलणं. पवारसाहेब हे विरोधी पक्षांचे शक्तीस्थळ आहे, शक्तीस्थान आहे. त्यांना नामोहरम करणे आणि महाराष्ट्रातील युवकांना वेगळया दिशेने नेण्याचा प्रयत्न या पध्दतीची लोकं करताना दिसत आहेत. औरंगजेबाचा पुळका कुणालाच यायची गरज नाही. औरंगजेबाच्याबाबतीत महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या ज्या भावना आहेत त्याच आमच्या सर्वांच्या आहेत परंतु मुद्दामहून ते जोडण्याचे काम काही लोकं करत आहेत आणि जी लोकप्रियता वाढवण्याचा प्रयत्न होतो तो आता संपला आहे म्हणून आता निवडणुकांच्या आधी या मार्गाला काही लोकं लागली आहेत असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.

कुठल्याही गोष्टीचे उदात्तीकरण करण्याच्या बाजुचे आम्ही कधीच नाही. जे घडले त्यावर तात्काळ कारवाई करायला हवी होती. सरकारच काही करत नाही हा सरकारचा नाकर्तेपणा आहे. सरकारला हे सर्व स्प्रेड व्हावं असं वाटतं आहे का? दोन धर्मात तणाव निर्माण व्हावा असे वाटते आहे का? तुम्हाला स्टेटस ठेवणारे सापडले तर असे कुणी पकडले का नाही. अहमदनगरमध्ये औरंगजेबाचे फोटो मिरवण्यास परवानगी देता. पोलीस समोर होते त्यांना ते थांबवता आले नाही. हे काय चालले आहे? तुम्ही औरंगजेबाचे उदात्तीकरण करणार्‍यांना काम करायला वेळ देताय आणि दोन धर्मात तेढ कशी निर्माण होईल याची वाट बघताय हे चांगलं नाही. पोलिसांना उदात्तीकरण करताना लोक दिसत आहे तर त्याचवेळी कारवाई केली पाहिजे होती. त्यावर तिसर्‍या दिवशी राज्याच्या गृहमंत्र्यांने प्रतिक्रिया देणे औरंग्यांचे नाव घेणार्‍यांना खपवून घेणार नाही. अरे पण तुमच्या पोलिसांनी तिथेच का कारवाई केली नाही. त्यांच्यासमोर घटना घडतात आणि त्यावर पोलीस काम करत नसतील त्यांना तुम्ही सांगितले होते का? जे सुरू आहे ते सुरू राहूदे? त्यांना काय करु नका… त्यांना संरक्षणात मिरवणूक काढू द्या असा त्याचा अर्थ झाला अशी जोरदार टीका करतानाच सरकार कुणाचे आहे आता असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

शरद पवारसाहेबांनी कायम अशा अनिष्ट प्रवृत्तींना लवकर आळा घालावा अशी मागणी केली आहे. या राज्यात दंगली घडवल्या तर कुणाचा फायदा होतो हे सगळयांना जगजाहीर आहे. म्हणून राज्यात आपली लोकप्रियता कमी झाली आहे ती सावरण्यासाठी काही लोकं असा प्रयत्न करत असतील पण पवारसाहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस किंवा कॉंग्रेस हे कधीही अशापध्दतीच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करणारे नाहीत याची महाराष्ट्रातील लोकांना खात्री आहे. त्यामुळे प्रविण दरेकर काय बोलायचे ते बोलू दे महाराष्ट्राला माहीत आहे पवारसाहेब कशापद्धतीने पुरोगामी विचारांचे पाईक आहेत ते असेही जयंत पाटील म्हणाले.

महाराष्ट्रात काही लोकांची लोकप्रियता खाली गेली आहे ती पुन्हा मिळविण्यासाठी बाकीच्या सगळ्या गोष्टी, मार्ग, पर्याय संपलेले दिसत आहेत म्हणून या शेवटच्या पर्यायाकडे ही लोकं पावले टाकायला लागली आहेत असा थेट आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे.

महाराष्ट्रातील राजकारण कोणत्या स्तरावर नेण्याचा प्रयत्न या राज्यात काही शक्ती करत आहेत हे यातून पुढे आले आहे. पवारसाहेबांच्या बाबतीत अशी धमकी देण्याचे धाडस महाराष्ट्रात जर कुणी करत असेल तर त्याची तातडीने दखल राज्याच्या पोलीसांनी घेतली पाहिजे. तातडीने उपाययोजना केल्या पाहिजेत. सोशल मिडियावर केलेलं लिखाण आहे असं समजून आणि साधी कलमे लावून त्या व्यक्तीला सोडून देण्याचे काम करु नये. अशा पध्दतीचा विचार करणार्‍या ज्या प्रवृत्ती आहेत त्यांना पुर्ण प्रायश्चित्त देण्याचे काम गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी तातडीने करावे असे आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे.

दाभोळकर हे पुरोगामी विचार खंबीरपणाने मांडत होते. कुठल्याही अंधश्रद्धा यांच्याविरोधात सतत आवाज उठवत होते सनातनी प्रवृत्तीच्या लोकांना दाभोळकरांची अडचण झाली होती हे खरंच आहे. आज शरद पवारसाहेबांनी देखील महाराष्ट्रात आणि देशात पुरोगामी विचारांची कास धरुन काम केले आहे आणि हा आपल्या मार्गातील मोठा अडथळा आहे असं समजणारे फार लोकं दुसर्‍या बाजूला आहेत त्यामुळे हा जो विचार ‘तुमचा दाभोळकर करु’ हा एका व्यक्तीचा नाही. या राज्यातील सनातनी प्रवृत्तीच्या काही लोकांचा आहे. एवढंच सांगतो अशा कोणत्याही अपप्रवृत्ती पोलीस जर योग्य कारवाई करणार नसेल तर मग जनताच काय करायचे ठरवेल असा सज्जड इशाराही जयंत पाटील यांनी दिला आहे.

आज खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी स्वतः वडिलांना धमकी आली म्हणून मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार दाखल केली. एव्हाना त्या व्यक्तीला अटक व्हायला हवी होती. पण तसं होणार नाही. कारण अप्रत्यक्षरीत्या अशा गोष्टींचे समर्थन करणारे लोकं आज त्यांना अटक करण्याच्या मनस्थितीत दिसत नाही असं आम्हाला दिसते त्यामुळे महाराष्ट्र कोणत्या स्तरावर नेऊन ठेवलाय हे सगळ्यांना दिसायला लागले आहे. लवकरात लवकर त्या व्यक्तीला आणि त्यासोबत असलेला जो ग्रुप आहे. नेहमी चॅट करणारे त्यांचे चॅट तपासले पाहिजे. फोनवर काय चालते हे तपासले पाहिजे अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.

तो भाजप कार्यकर्ता आहे असं तो म्हणतोय. अलीकडे ट्वीटर हँडल वर जे लिखाण करतात त्या लोकांना देशातील फार मोठे लोकं फॉलो करतात आणि प्रोत्साहन देतात. त्यामुळे अशा प्रवृत्ती देशात वाढल्या पाहिजेत आणि द्वेषाचे राजकारण देशात निर्माण झाले पाहिजे असा प्रयत्न देशात व महाराष्ट्रात सुरू आहे. महाराष्ट्र नेहमीच पुरोगामी विचारांना पाठिंबा देणारा आहे. महाराष्ट्र इतर राज्यांपेक्षा जास्त सुजाण आहे आणि निश्चितपणाने जाणीवपूर्वक हे चाळे कोण करतंय हे महाराष्ट्राला हळूहळू कळायला लागले आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

निलेश राणे (Nilesh Rane) याने एवढे गंभीर विधान केले आहे. याबाबतीत त्यांना दोष देण्याची गरज नाही कारण त्याचे बोलवते धनी वेगळे आहेत. बोलवते धनी सत्तेत बसल्यामुळे अशा प्रवृत्तींना जोर फुटायला लागला आहे. तू बोल… तू काही चिंता करू नको… आज सगळ्यांना माहीत आहे की, शरद पवारसाहेब हेच महाराष्ट्राचे चित्र बदलू शकतात. महाविकास आघाडी सत्तेवर येण्याची दिशा दाखवण्याचे काम पवारसाहेब करु शकतात. शरद पवारसाहेब हाच मोठा अडथळा आहे असे समजून काही लोकं महाराष्ट्रात त्यांची प्रतिमा डागळत आहे. त्यांना टोकाच्या भाषा वापरणे, टिका करणे व स्वतः प्रसिद्धी मिळवणे आणि ज्यांना ते प्रोत्साहन देत आहेत त्यांना प्रोत्साहन देत खुश करण्याचे काम आज चालू आहे असा अप्रत्यक्ष टोलाही जयंत पाटील यांनी भाजपला लगावला.