चमकोगिरी करत एसटी चालवणे जयंत पाटील यांना चांगले महागात पडणार ?

सांगली – चर्चेत राहण्यासाठी अनेकदा नेते मंडळी चमकोगिरी करताना पाहायला मिळतात मात्र बऱ्याचवेळा ही चमकोगिरी अंगाशी येते. असाच काहीसा प्रकार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत घडला आहे. माजी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांचा एसटी (ST) चालवतानाचा एक व्हीडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. पण याच व्हीडिओमुळे जयंत पाटील यांच्याबाबत नवा वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.

जयंत पाटील यांनी कोणताही परवाना नसताना बेकायदेशीररित्या सांगलीतील इस्लामपूर (Islampur) आगाराची बस चालवली, असं म्हणत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपने (BJP) केली आहे.यासंदर्भात भाजपने इस्लामपूर पोलिसात तक्रारही दिल्याची माहिती समोर आली आहे.

एसटी चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना जड वाहनचालक म्हणून आवश्यक असणारा परवाना बॅच बिल्ला नसताना जयंत पाटील यांनी जड वाहन बेकायदेशीररित्या चालवलं, असा आरोप भाजपच्या इस्लामपूर येथील पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

केवळ जयंत पाटील नव्हे तर आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील (Rohit Patil) यांनीही एसटी बस चालवल्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. त्याबाबत भाजपकडून तक्रार दाखल झाली किंवा नाही याची माहिती मिळू शकली नाही. टीव्ही 9 मराठीने याबाबत वृत्त दिले आहे.