शरद पवारांचा विदर्भ दौरा; जागोजागी होत आहे योध्याचे भव्य स्वागत

नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी काही लोकांनी हल्ला केला, चपला फेकल्या व शरद पवार यांच्या नावाने अश्लाघ्य भाषेत घोषणा दिल्या. कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनानंतर आता तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, शरद पवार आज अमरावती दौऱ्यावर आहेत. सध्या ते नागपुरात दाखल असून या ठीकठिकाणी त्यांचे भव्य स्वागत करण्यात येत आहे. नागपूर आणि अमरावतीमध्येही पवारांच्या कार्यक्रमस्थळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. तर नागपूर विमानतळावरही पोलिसांचा फौजफाटा आहे. दुसऱ्या बाजूला पवारांच्या मुंबईतील घरावर एसटीच्या आंदोलक कामगारांनी केलेल्या हल्ल्यानंतर या दौऱ्यात त्यांच्या सुरक्षेची विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.

नागपूर विमानतळावर शरद पवार यांच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यात आलेत. त्यावर कोठडीत असलेले माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचं छायाचित्र ठळकपणे दिसतंय. देशमुख यांना अटक झाल्यानंतरही पवार यांनी त्यांचं वारंवार समर्थन केलंय. या पार्श्वभूमीवर हे फलक लक्ष वेधून घेत आहेत.