‘जोशुआ यांनी आपली नेतृत्व क्षमता सिद्ध करून दाखविली, कांदोळकर यांच्यात नेतृत्व गुण नाही’

म्हापसा : गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाचे सत्र चालूच आहे. यातच आता माजी उपनगराध्यक्ष विनोद फडके यांनी कॉंग्रेसचे उमेदवार सुधीर कांदोळकर यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. २०१७ च्या पोटनिवडणुकीत मी सुधीर कांदोळकरांना पाठिंबा दर्शविला होता. मात्र, सुधीर यांना योग्य धोरण अवलंबिता आले नाही. सुधीर कांदोळकर यांच्यात नेतृत्व गुण नाही, अशी टीका विनोद फडके यांनी केली.

उत्तर गोवा भाजप कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा भाजपा नेते रोहन कवळेकर, बार्देश भंडारी समाजाचे अध्यक्ष नारायण मांद्रेकर आदी नेते उपस्थित होते.दरम्यान, विनोद फडके यांनी येत्या निवडणुकीत म्हापशाचे भाजपाचे उमेदवार जोशुआ डिसोझा यांना आपला पाठिंबा दर्शविला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, २०१७ मध्ये जोशुआ हे नवखे असल्याने त्यांना राजकारण जमणार नाही, असे मला वाटते होते. मात्र, जोशुआ यांनी आपली नेतृत्व क्षमता सिद्ध करून दाखविली. पालिका निवडणुकीत स्वतः च्या हिंमतीवर भाजपप्रणित पालिका मंडळ स्थापन करुन दाखविल्याचे फडके म्हणाले.

दरम्यान, यावेळी कॉंग्रेस नेते मायकल लोबो यांच्यावरमाजी नगराध्यक्ष तथा भाजपा नेते  रोहन कवळेकर यांनी तोफ डागली . लोबो कचरा व्यवस्थापन मंत्री असताना त्यांनी म्हापशासाठी कोणती मदत केली, ते सांगावे. कळंगुटमधील घरे नियमित करून देण्यासोबतच, तेथील राणकार, मच्छीमार बांधवांची त्यांनी नेहमीच फसवणूक केल्याचा आरोप  रोहन कवळेकर यांनी केले.