तो ‘आफताब’ असल्याने भक्तांना या प्रकरणात रस; श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी निखिल वागळेंची लक्षवेधी पोस्ट

नवी दिल्ली – दिल्लीच्या मेहरौली भागात एका व्यक्तीने आपल्या लिव्ह-इन पार्टनरचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर, मृतदेहाचे सुमारे 35 तुकडे 300 लिटर क्षमतेच्या रेफ्रिजरेटरमध्ये सुमारे तीन आठवडे ठेवण्यात आले आणि एक एक करून ते राष्ट्रीय राजधानीच्या विविध भागात फेकण्यात आले. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) या २६ वर्षीय तरुणीच्या हत्येप्रकरणी सध्या दिल्ली पोलिसांनी श्रद्धाचा प्रियकर आफताब अमीन पूनावाला याला ताब्यात घेतले आहे. यानंतर या आरोपीने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. दरम्यान, या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून अनेकांनी सोशल मिडीयावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

यातच आता या प्रकरणाला लव्ह जिहादशी जोडले जात असून नेटकरी या प्रकरणावर व्यक्त होताना दिसत आहेत. अशातच पत्रकार निखिल वाघळे (Nikhil Wagle) यांनी लक्षवेधी अशी सोशल मीडिया पोस्ट केली आहे. “आफताबने केलेली श्रद्धाची हत्या माणुसकीला कलंक आहे. पण तो ‘आफताब’ असल्याने भक्तांना या प्रकरणात रस आहे,” अशा आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे. या पोस्टवर अनेक उलटसुलट प्रतिक्रिया येत असून अनेकांनी वागळे यांनाच लक्ष्य केले आहे.