दुसऱ्या जातीच्या मुलावर प्रेम केलं म्हणून बापानं मुलीला संपवलं? वृत्त समजताच प्रियकरानंही टोकाचं पाऊल उचललं 

कर्नाटकच्या कोलारमधल्या बोदागुरकी गावात एक धक्कादायक घटना घडली. मुलीचं दुसऱ्या जातीच्या मुलावर प्रेम असल्याचं समजल्यानंतर मुलीच्या कुटुंबात मोठा वाद झाला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी या मुलीची हत्या झाल्याची बाब समोर आली आहे. हे समजताच मुलानंही आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

२० वर्षांची हि मुलगी पदवीचं शिक्षण घेत होती. किर्तीचं त्यांच्या घराशेजारीच राहणाऱ्या २३ वर्षीय युवकावर  प्रेम होतं. पण तो दुसऱ्या जातीचा असल्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांना ही बाब पसंत नव्हती. यावरून सोमवारी संध्याकाळी किर्तीच्या घरी मोठा वाद झाला. दुसऱ्याच दिवशी सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान तिची हत्या करण्यात आल्याची बाब समोर आली. ही हत्या मुलीच्या वडिलांनीच केल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दुसऱ्या बाजूला  प्रियकराने मृत मुलीच्या अंत्यविधीला उपस्थिती लावली. त्यानंतर त्याचा भाऊ त्याला धीर देण्यासाठी बाईकवरून बाहेर घेऊन जात असताना त्यानं मध्येच रस्त्यात भावाला बाईक थांबवायला सांगितली. खाली उतरताच त्याने बाजूच्या रेल्वे ट्रॅकवरून वेगाने येणाऱ्या ट्रेनसमोर उडी मारून त्यानं आत्महत्या केली. या प्रकरणी कामसमुद्र पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे.