बहुसंख्याकवादी सरकार लोकांवर समान नागरी कायद्याची जबरदस्ती करू शकत नाही – चिदंबरम 

 UCC : गेल्या अनेक दिवसांपासून देशात समान नागरी संहिता (UCC) बद्दल सतत चर्चा होत आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळवारी (२७ जून) सांगितले की, एका घरात दोन कायदे चालू शकत नाहीत. त्यानंतर सातत्याने राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यूसीसीवरील वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसीपासून अनेक इस्लामिक संघटनांनी यूसीसीवर आक्षेप घेतला आहे. मुस्लिम समुदाय यूसीसीकडे धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप म्हणून पाहत आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानेही यावर नाराजी व्यक्त करत निषेध व्यक्त केला आहे.

दरम्यान, नेहमीप्रमाणे कॉंग्रेसने या मुद्द्याला विरोध सुरु केला आहे. यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली आहे. भारताच्या संविधानाने भारतातील विविधता जोपासली आहे. समान नागरी कायदा ही एक आकांक्षा आहे. बहुसंख्याकवादी सरकार लोकांवर समान नागरी कायद्याची जबरदस्ती करू शकत नाही. पंतप्रधानांनी विधी आयोगाचा अहवाल वाचावा. समान नागरी कायदा व्यवहार्य नसल्याचा निष्कर्ष या अहवालातून निघतो. भाजपाच्या कृतीमुळे आज देश दुभंगला आहे, असा हल्लाबोल चिदंबरम यांनी केला आहे.