करुणा शर्मा कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात; शिवशक्ती सेनेच्या अधिकृत उमेदवार

कोल्हापूर – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर उत्तर मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव हे विजयी झाले होते. मात्र डिसेंबर महिन्यात त्यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर आता या मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. भाजपने ही निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली असून महाविकास आघाडी देखील ही जागा जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे.

दरम्यान या पोटनिवडणुकीसाठी रंगत येत असून या रणांगणात आता करुणा शर्मा यांनी देखील एन्ट्री केली आहे. करुणा शर्मा या मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर चर्चेत आल्या होत्या. आता आगामी कोल्हापूर पोटनिवडणुकीत त्या शिवशक्ती सेनेच्या अधिकृत उमेदवार असतील.

करुणा शर्मा यांनीच हा पक्ष स्थापन केलेला आहे. गेले काही दिवस पक्षातर्फे कोण उमेदवार असेल यावर मंथन झालं आणि अखेरीस करुणा शर्मा यांनी स्वतःच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय. पक्ष स्थापनेनंतर थेट विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उतरल्यानं करुणा शर्मा यांची आणि त्यांच्या पक्षाचीही चर्चा होत आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 17 मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल केले जातील, 12 एप्रिल रोजी मतदान पार पडेल, तर 16 एप्रिलला मतमोजणी होणार आहे.राजकीय जाणकारांच्या मतानुसार ही पोटनिवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.