लाथ मारा त्या खासदारकीला; शिवसेना प्रवेशासंदर्भात संभाजीराजेंना निलेश राणेंचा सल्ला

मुंबई : छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांना शिवसेना पुरस्कृत नाहीतर शिवबंधन बांधून (build Shivbandhan) सेनेत प्रवेश केल्यानंतरच पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून पाठिंबा देणार असल्याचे शिवसेनेतर्फे स्पष्ट सांगण्यात आले आहे. याचा अर्थ शिवबंधन बांधले नाही तर शिवसेना (Shiv Sena) पर्यायाचा विचार करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शिवसेना शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर संभाजीराजे छत्रपती शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकीकडे शिवसेना आणि संभाजीराजेंदरम्यान चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे भाजपा प्रदेश सचिव तसेच माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विटरवरुन या प्रकरणावर भाष्य करताना संभाजीराजेंना खासदारकीवर लाथ मारण्याचा सल्ला दिलाय. शिवसेना आणि संभाजीराजेंदरम्यान चर्चा सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर निलेश राणेंनी ट्विटरवरुन शिवसेनेवर निशाणा साधलाय.

ते म्हणाले,  “कोल्हापूरचे छत्रपती संभाजी, आज रात्रभर विचार करा की ज्या पक्षाने मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणून खिल्ली उडवली, तुमच्याकडे महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे मागितले, औरंगजेबच्या कबरीला संरक्षण दिले, पक्षात १२ वाजता या सांगून तुमची काय किंमत ठेवली? लाथ मारा त्या खासदारकीला,” असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.