‘किरीट सोमय्या हे मनोरंजन करणारे पात्र, असे पात्र राजकारणात असावेतच’

मुंबई : मंत्रालयातील नगरविकास खात्याच्या कार्यालयात जाऊन फाईल्स पाहिल्यामुळे वादात सापडलेले भाजप नेते किरीट सोमय्या आता ठाकरे सरकारवर आणखी एक बॉम्ब टाकण्याची शक्यता आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा मुलगा जय पवार किरीट सोमय्या यांच्या रडारवर असल्याचे समजते. जय पवार यांचे कारनामे मी लवकरच उघड करणार असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला.

किरीट सोमय्यांनी धमक्या देणं, मुजोरी, दादागिरी सहन करणार नाही, असं म्हटलंय, मुख्यमंत्र्यांमध्ये कारवाईची हिम्मत नाही, मी चॅलेंज करतो मला हात लावून दाखवा, असंही ते म्हणाले आहेत.

त्यानंतर किरीट सोमय्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या हे एक मनोरंजन करणारे पात्र आहे आणि असे मनोरंजन करणारे पात्र राजकारणात असावे आणि त्यांच्याकडून जनतेचे असेच मनोरंजन होत राहावे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला. मंत्रालयात येऊन फाईल चेक केल्याचा मुद्दा माध्यम प्रतिनिधींनी विचारला असता नवाब मलिक यांनी किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका केली.

किरीट सोमय्या हे मनोरंजन करणारे पात्र असून त्यांच्या बोलण्याच्या माध्यमातून जनतेचे मनोरंजन होत आहे. त्यांनी आणखी मनोरंजन करत राहावे. त्यांना आधी पक्ष गांभीर्याने घेत नव्हता आणि त्यांना आम्हीही गंभीरतेने घेत नाही, असेही नवाब मलिक म्हणाले.