जय पवार सोमय्यांच्या रडारवर?, अजितदादांनी एका वाक्यात लावला निकाल…

मुंबई : मंत्रालयातील नगरविकास खात्याच्या कार्यालयात जाऊन फाईल्स पाहिल्यामुळे वादात सापडलेले भाजप नेते किरीट सोमय्या आता ठाकरे सरकारवर आणखी एक बॉम्ब टाकण्याची शक्यता आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा मुलगा जय पवार किरीट सोमय्या यांच्या रडारवर असल्याचे समजते. जय पवार यांचे कारनामे मी लवकरच उघड करणार असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला.

किरीट सोमय्यांनी धमक्या देणं, मुजोरी, दादागिरी सहन करणार नाही, असं म्हटलंय, मुख्यमंत्र्यांमध्ये कारवाईची हिम्मत नाही, मी चॅलेंज करतो मला हात लावून दाखवा, असंही ते म्हणाले आहेत.

त्यानंतर किरीट सोमय्या यांच्या आरोपांवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कायदा सर्व श्रेष्ठ असतो. या देशात नियमाचे उल्लंघन कोण करत असेल तर कायदे आहेत. कायदे पाळले जात नसतील तर खपवून घेतलं जात नाही. पण काही लोकं नुसतंच केवळ विधानं करत असतात. काही चॅनेलने तर कोणत्या दिवशी काय विधाने केली हे दाखवलं आहे. त्यामुळे अशा लोकांना अधिक महत्त्व देण्याची गरज नाही. -उद्या ते कुणाचंही नाव घेणार आणि तुम्ही प्रश्न विचाराल हे योग्य नाही. आम्हाला कुणाच्या कुटुंबीयांबाबत बोलायचं नाही, असं अजित पवार म्हणाले.