‘रश्मी वहिनींवरील टीका कदापि सहन करणार नाही, तुमच्या फडणवीसबाईंना विरोधीपक्ष नेते करा’

मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे.अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल मंत्रीमंडळ सदस्यांसमवेत संध्याकाळी चहापानाचा कार्यक्रम पार पडला. तत्पूर्वी सह्याद्री अतिथीगृहात मंत्रीमंडळातील मंत्र्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. दरम्यान, उद्धव ठाकरे हे आजारपणामुळे विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावणार की नाही, यावर बरीच चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

यावरूनच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. ‘मुख्यमंत्री आजारी असल्यामुळे ते गैरहजर असणे स्वाभाविक आहे. आमच्या एवढाच आग्रह असा आहे की, परंपरेनुसार तुम्ही कुणाला तरी चार्ज द्यावा. त्याची प्रोसेस लंबी आहे. त्यासाठी चार्ज राज्यपालांकडे रजिस्टर करावा लागतो. तुम्ही राज्यपालांना कितीही मानायचं नाही ठरवलं तरी सुद्धा राज्यपालाशिवाय काहीही करता येत नाही. त्यांचा अन्य दोन सहकाऱ्यांसोबतचा अविश्वास स्वाभाविकच आहे. कारण त्यांनी तो चार्ज घेतला, तर सोडणारच नाहीत. त्यांच्या जर पार्टीतही कोणाकडे विश्वास नसेल, तर रश्मी वहिनींना चार्ज देवून त्यांना मुख्यमंत्री करता येऊ शकतं. रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. त्यांना मंत्री म्हणून सामील करून घ्या. आदित्य ठाकरेंनाही ते चार्ज देवू शकतात. आदित्य ठाकरेंकडे चार्ज दिला पाहिजे, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले.

चंद्रकांत पाटील यांच्या या टीकेला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘रश्मी ठाकरे यांच्यावरील टीका कदापि सहन करणार नाही. तुम्ही अमृता फडणवीस यांना विरोधीपक्ष नेते करणार का ? आधी हे सांगा कारण त्या जास्त लाईमलाईट मध्ये आहेत. रश्मी वाहिनी कधीच लाईमलाईट नसतात तरी तुम्ही त्याचं नाव घेता तुम्हाला कळत का ? तुम्ही स्रियांच किती हनन करणार आहात ?’ असा घणाघात किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

तर, दुसरीकडे ‘एकवेळेस आदित्य ठाकरे याचं नाव घेण चालेल कारण ते मंत्रीमोहादय आहेत. पण तुम्ही रश्मी वहिनींचे नाव का घेता ? लाईमलाईट मध्ये असणाऱ्या तुमच्या फडणवीसबाईंना कराना विरोधीपक्ष नेते.’ असा टोला किशोरी पेडणेकर यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.