चुका बघू नका भावना समजून घ्या.. ‘आदिपुरुष’च्या वादावर क्रिती सेनॉनच्या आईची हळवी पोस्ट

ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष (Adipurush directed by Om Raut) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता होती. परंतु हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात निराशा झाल्याचं दिसत आहे. या चित्रपटात दाखवल्या गेलेल्या दृश्यांवर प्रेक्षक नाराजी व्यक्त करत आहेत. अगदी राजकीय वर्तुळातूनही या चित्रपटावर प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच आता चित्रपटात सीता मातेची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री क्रिती सेनॉनच्या (Kriti Sanon) आईने वादावर मौन सोडले आहे.

काय म्हणाली क्रितीची आई?

क्रिती सेनॉनची आई (Kriti Sanon mother) गीता (Geeta Sanon) यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत लिहिले- ‘जय श्री राम। जाकी रही भावना जैसी, प्रभु मूरत तिन तैसी…’ म्हणजेच चांगल्या विचाराने आणि दृष्टीने बघितले तर जग सुंदर दिसते.

त्यांनी असेही लिहिले आहे की प्रभू रामानेच आपल्याला शबरीच्या बोरांमध्ये त्यांचे प्रेम पाहण्यास शिकवले, ते खोटे नव्हते. म्हणूनच माणसाच्या चुकांकडे बघू नका, भावना समजून घ्या. अशी पोस्ट क्रितीच्या आईने लिहिलीय.